खारेपाटण (प्रतिनिधी) : प्राचीन मंदिर स्थापत्य व कातळशिल्प अभ्यासक तसेच कोकण इतिहास परिषद सिंधुदुर्गचे अध्यक्ष रणजित रमेश हेर्लेकर व शिवप्रेमी, गडप्रेमी,शिवव्याख्याते इतिहास अभ्यासक भूषण साटम यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘कोकणचे शिलेदार’ व ‘शिवशंभू विचार मंच’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गडकिल्ले संवर्धन – आजचे विद्यार्थी व छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन खारेपाटण हायस्कूल येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास,गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व तसेच गड-किल्ल्यांच्या संवर्धनाची गरज याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.”महाराष्ट्रातील गडकिल्ले ही आपल्या समृद्ध इतिहासाची आणि शौर्याची जिवंत साक्ष असून,त्यांचे जतन व संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांनी इतिहासाचा अभ्यास करून गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा.” असे आवाहन यावेळी भूषण साटम यांनी विद्यार्थ्यांना केले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि ऐतिहासिक वारशाचा जागर निर्माण करण्याबरोबरच गडकिल्ले संवर्धनाची जबाबदारी भावी पिढीने स्वीकारावी, असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. या कार्यक्रमास विद्यार्थी व इतिहास प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमासाठी खारेपाटण हायस्कूल चे माजी विद्यार्थी कु. अक्षय तेली याने विशेष सहकार्य केले. व्याख्यानाच्या उद्घाटनप्रसंगी प्रशालेचे प्राचार्य संजय सानप यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक दयानंद कोकाटे श्री. नाईक, श्री. कानागल आणि कोकणचे शिलेदार मंच चे प्रकाश कुबल, कु.सिद्धी राऊत, साहिल गुरव, सार्थक जाधव, अभिषेक शिरकर, श्रेयश बाविलकर, सुमेधा तावडे, दिनेश माने व यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.












