‘तोरण’ गटाने जिंकली यंदाची के पी एल स्पर्धा
आचरा (प्रतिनिधी) : कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा – मालवण आणि सानेगुरुजी कथामाला, शाखा -मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी वर्षाऋतूत घेण्यात येणारा वर्षानंद मेळावा २०२६ नुकताच डॅफोडिल्स रिसॉर्ट आचरा येथे थाटात संपन्न झाला. त्यावेळी कोमसाप प्रीमियर लीग (के पी एल) च्या स्वराक्षर स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये ‘तोरण’ गटाने यावर्षीचे अजिंक्यपद पटकावले. प्रारंभी सुरेश ठाकूर गुरुजी ,अध्यक्ष कोमसाप शाखा मालवण, रुजारियो पिंटो जिल्हा प्रतिनिधी कोमसाप, रामचंद्र आंगणे माजी उपशिक्षणाधिकारी, बाबाजी भिसळे, सर्व सल्लागार समिती सदस्य, जेराॅन फर्नांडिस सरपंच आचरा, दत्तात्रय मुळीक माजी गटशिक्षणाधिकारी मालवण, सुजाता टिकले, निलेश सरजोशी, गिरीधर पुजारे, अशोक कांबळी, मनाली फाटक, तुकाराम पडवळ पोलीस उपनिरीक्षक आचरा आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला. उपस्थित १२० सदस्यांची सहा गटात विभागणी केली होती. त्यांना अनुक्रमे तोरण, झुंबर, देवकेळ, ढोलकाठी, चंद्रोदय, देवकी अशी नावे देण्यात आली होती. कोमसापचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या सहा कथासंग्रहावरून ही नावे देण्याची अभियोजना आखण्यात आली होती. साहित्याची ओढ सर्व सदस्यांमध्ये रुजावी म्हणून मराठी कादंबरी, लघुकथा, नाटक, काव्य यावर आधारित प्रश्नमंजुषा घेण्यात आली. तसेच सहा गटांसाठी स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या नृत्यगीतांवर आधारित अभिनय समूहनृत्य स्पर्धा घेण्यात आली.
या नृत्यगीतांमध्ये ‘कशी झोकात चालली कोळ्याची पोर…’, मी पतंग उडवीत होते’, ‘गोमू संगतीनं ..’, ‘नाच रे मोरा ..’, ‘रेशमाच्या रेघांनी’… ‘तुझ्या गळा माझ्या गळा…’ या नृत्य गीतांचा समावेश होता. रसिक वर्गाने या सर्व गीतांना भरभरून दाद दिली. साहित्य, नाट्य, नृत्य आणि सामान्यज्ञान यावर आधारित असलेल्या या स्पर्धेमध्ये
यावर्षी ‘तोरण’ या गटाने प्रथम क्रमांक पटकावला. मान्यवरांच्या हस्ते त्यांना मानाचा चषक प्रदान करण्यात आला. या सोहळ्याला गुरुनाथ ताम्हणकर, पांडुरंग कोचरेकर, सुरेंद्र सपकाळ, सदानंद कांबळी, प्रकाश पेडणेकर, रामचंद्र कुबल, श्रुती गोगटे, माधव गावकर, नेहा बापट, चंद्रशेखर धानजी, स्वराशा कासले, त्रिंबक आजगांवकर, दत्ताराम सावंत, अनघा कदम, संजय परब, सायली परब, तेजल ताम्हणकर, महादेव बागडे, रमाकांत शेट्ये, विठ्ठल लाकम, सुनंदा कांबळे, कुमार कांबळे, विजय चौकेकर आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. वंदना राणे, उज्ज्वला धानजी, रश्मी आंगणे, शरयू घाडी, ऋतुजा केळकर, मधुरा माणगांवकर यांनी अनुक्रमे तोरण, झुंबर, देवकेळ, डोलकाठी, चंद्रोदय, देवकी या गटांच्या गटप्रमुखांची जबाबदारी सांभाळली. सायंकाळी उत्तरोत्तर रंगत जाणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी अधिकच बहार आणली. शेवटी ‘पुन्हा भेटूया’ ‘वर्षानंद मेळावा २०२७’ असे सांगत वर्षागीतातून एकमेकांचा निरोप घेण्यात आला.












