पालकमंत्री नितेश राणेही उपस्थित राहणार; निवेदने घेऊन उपस्थित राहण्याचे प्रभाकर सावंत यांचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या संयुक्त दौऱ्याचे आयोजन सोमवारी (ता. ३) कणकवली येथे करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता कणकवली तहसीलदार कार्यालयात होणाऱ्या या कार्यक्रमात जिल्ह्यातील नागरिक, शेतकरी व महिलांच्या महसूलविषयक अडचणी जाणून घेऊन त्यांची निवेदने स्वीकारली जाणार आहेत. नागरिकांनी आपल्या समस्या लिखित स्वरूपात घेऊन सकाळी साडेदहा वाजता तहसीलदार कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले आहे.
महसूलमंत्री बावनकुळे यांनी गेल्या वर्षी सिंधुदुर्ग दौऱ्यात नागरिकांच्या समस्या आणि निवेदने जाणून घेतली होती. शेतकऱ्यांना शेतापर्यंत बारमाही दळणवळणाची सुविधा मिळावी, यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या शेतपाणंद रस्ते योजनेची घोषणा त्यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यातूनच केली होती. त्यानंतर या योजनेला राज्यभर गती देण्यात आली. त्यामुळे यंदाच्या दौऱ्यातही शेतकरी व नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांवर निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
महिला शेतकऱ्यांना दाखल्याचा निर्णय महसूल विभागामार्फत शेतकरी महिलांना शेतकरी दाखला उपलब्ध करून देण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे महिला शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले.
कर्जमुक्तीनंतर सातबारा कोरा करण्यासाठी प्रयत्न शासनाच्या कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर कर्जाची नोंद कायम राहू नये, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यासाठी महसूलमंत्री बावनकुळे प्रयत्नशील असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून महसूलमंत्र्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. महसूल विभागाशी संबंधित कोणतीही अडचण, शेतजमीन, सातबारा, फेरफार, दाखले, शेतपाणंद रस्ते तसेच इतर प्रश्न असलेल्या नागरिकांनी आपली समस्या स्पष्टपणे नमूद केलेले लिखित निवेदन घेऊन उपस्थित राहावे. सोमवारी सकाळी साडेदहा वाजता कणकवली तहसीलदार कार्यालयात उपस्थित राहून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदन द्यावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले आहे. महसूलमंत्र्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने जिल्ह्यातील शेतकरी, महिला आणि नागरिकांच्या प्रलंबित महसूलविषयक प्रश्नांना थेट शासनस्तरावर वाचा फोडण्याची संधी उपलब्ध झाली असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असेही भाजपकडून आवाहन करण्यात आले आहे.












