आधार प्रमाणीकरणाशिवाय खात्यात रक्कम जमा होणार नाही; जिल्ह्यात १५६३ जणांचे प्रमाणीकरण अद्याप बाकी
ओरोस (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२०७ पात्र शेतकऱ्यांकडे अॅग्रीस्टॅक/फार्मर आयडी उपलब्ध नसल्याने त्यांचे आधार प्रमाणीकरण होऊ शकलेले नाही. फार्मर आयडीशिवाय आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण होणार नसून, प्रमाणीकरणाशिवाय कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाही. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी तातडीने अॅग्रीस्टॅकवर नोंदणी करून फार्मर आयडी प्राप्त करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.
जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी सोमवारी (३) तारिणी सभागृहात पत्रकार परिषद घेऊन कर्जमुक्ती योजनेच्या सिंधुदुर्गातील सद्यस्थितीची माहिती दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक प्रदीप मालगावे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ उपस्थित होते.
जिल्ह्यातील एकूण ६५०० कर्जखात्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी शासनाकडून आतापर्यंत ३७०८ कर्जखात्यांची आधार प्रमाणीकरणासाठी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यातील २१४५ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून, १५६३ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण अद्याप बाकी आहे. यामध्ये १२०७ शेतकऱ्यांकडे अॅग्रीस्टॅक/फार्मर आयडी नसल्याने त्यांच्या प्रमाणीकरणाची प्रक्रिया पुढे सरकलेली नाही.












