डामरे ग्रामस्थांच्यावतीने महसूल मंत्र्यांच्या हस्ते मानपत्र देऊन तहसीलदार दीक्षांत देशपांडेंचा सन्मान

डामरे कानडेवाडी येथील रस्त्याचा प्रश्न सामंजस्याने लावला मार्गी

कणकवली (प्रतिनिधी) : डामरे कानडेवाडी येथील रस्त्याचा प्रश्न गेले काही वर्ष प्रलंबित होता. तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी पुढाकार घेत नुकत्याच दोन्ही बाजूमध्ये तडजोड घडून आणून हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. याबद्दल कानडेवाडी ग्रामस्थांच्यावतीने तहसीलदारांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सन्मानपत्र देत गौरव करण्यात आला.

यावेळी महसूल मंत्री श्री बावनकुळे यांनीही तहसीलदार ही दीक्षांत देशपांडे यांच्या कामाचे विशेष कौतुक केले. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रांताधिकारी जगदीश कातकर , पं स सदस्य बबलू सावंत, डामरे सरपंच किरण कानडे उपसरपंच संतोष मेजारी, माजी उपसरपंच सागर साटम, पोलीस पाटील विश्वास सावंत, विनायक पारधीये, निलेश साईल इतर उपस्थित होते.

ग्रामस्थांच्यावतीने देण्यात आलेल्या सन्मानपत्रात म्हटले आहे की, आमच्या गाव डामरे कानडेवाडी येथील रस्त्याचा देवी अनुभवानी उगमस्थानाकडे जाणारा मार्ग व गणपती विसर्जन कोंड हा मार्ग प्रदीर्घ काळापासून प्रलंबित होता. या संदर्भात असलेला वाद आपण अत्यंत कौशल्याने, निष्पक्षपणे आणि सामंजस्याने सोडवून तो रस्ता सर्व शेतकऱ्यांसाठी मोकळा करून दिल्याबद्दल ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्यावतीने आपले आभार व्यक्त करतो.

आपण दाखविलेली प्रशासकीय तत्परता सामाजिक बांधिलकी आणि शेतकऱ्यांच्या हिताचा घेतलेला निर्णय अत्यंत वाखाणण्याजोगा आहे. आपल्या या सकारात्मक पुढाकारामुळे या भागातील बळीराजाच्या येण्या जाण्याचा आणि शेतमालाच्या वाहतुकीचा मार्ग सुकर झाला आहे. आपण केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव व आमच्या मनातील कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे सन्मानपत्र प्रदान करत असल्याचे डांमरे ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आलेल्या सन्मानपत्रात म्हटले आहे.

error: Content is protected !!