चर्मकार समाजाचा आरक्षण उपवर्गीकरण विरोधी एल्गार

चळवळ नेणार गावागावात ; चर्मकार समाज उन्नती मंडळाचा निर्धार

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : अनुसूचित जाती मधील उपवर्गीकरण करण्यास तीव्र विरोध असल्याचे दर्शवत चर्मकार समाजाने पुन्हा एकदा संघटित होत उपवर्गीकरणविरोधात एल्गार केला आहे.आता ही चळवळ जिल्ह्यातील सर्व गावात नेऊन पोचवणार असल्याचे सिंधदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले.

सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाची सभा कुडाळ येथे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक ऍड.अनिल निरवडेकर, जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, उत्तम चव्हाण, सहसचिव बाबूराव चव्हाण, सुभाष बांबुळकर, तालुकाध्यक्ष कुडाळ -संतोष चव्हाण, कणकवली-महेंद्र चव्हाण,सावंतवाडी-विनायक चव्हाण, मालवण-हरेश चव्हाण, वैभववाडी-अनंत नेवरेकर यांचेसह जिल्हा व तालुका पदाधिकारी व महिला प्रतिनिधी उपस्थित होते.

अनुसूचित जाती मधील उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी मंडळाने काय करावे याचे मार्गदर्शन यावेळी एड.अनिल निरवडेकर, एड.नंदन वेंगुर्लेकर, उदय शिरोडकर, श्रीराम चव्हाण, रवींद्र कसालकर आदीनी केले.

यावेळी बोलताना प्रमुख मार्गदर्शक एड.निरवडेकर यांनी उपवर्गीकरण होऊ नये यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत सविस्तर मार्गदर्शन करतानाच कायदेशीर बाबींची माहिती विशद केली.तसेच तरुण वर्गाने सोशल मीडियाद्वारे या लढ्यात क्रांती घडवून आणावी असे आवाहन केले.जिल्हाध्यक्ष सुजित जाधव यांनी हा लढा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे यांनी उपवर्गीकरण संबंधी घडामोडी सांगून लढा टप्प्या टप्प्याने राबविण्यात सर्वांचा हातभार लागेल असे आवाहन केले. एड.नंदन वेंगुर्लेकर यांनी लढ्याच्या अनुषंगाने आवश्यक डेटा गोळा करावा लागेल अशी माहिती दिली.

उपवर्गीकरण विरोधी आंदोलन टप्प्याटप्प्याने अधिक बळकट करण्याचे नियोजन या सभेत करण्यात आले. जिल्ह्यातील प्रत्येक गावात ही चळवळ पोचविण्यात येऊन तळागाळातील सर्वांचा सहभाग घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. एकंदरीत पुन्हा एकदा चर्मकार समाजाने अनुसूचित जाती मधील उपवर्गीकरण होऊच नये यासाठी रणशिंग फुंकले आहे.

error: Content is protected !!