कणकवली (प्रतिनिधी) : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली कॉलेजमध्ये भारतीय रसायनशास्त्राचे जनक आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय रसायनशास्त्र दिन उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने रसायनशास्त्र विभागाच्या वतीने आचार्य रे यांच्या जीवनकार्याचा आढावा घेणारे विविध शैक्षणिक उपक्रम आयोजित करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य प्रा. युवराज महालिंगे होते. व्यासपीठावर कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. महादेव माने, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्यामराव डिसले आणि प्रा. कृष्णन मोहिते उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय रसायनशास्त्र दिनाचे औचित्य साधून मानवाच्या प्रगतीमध्ये रसायनशास्त्राने दिलेल्या अमूल्य योगदानाचा गौरव करण्यात आला.
अध्यक्षीय मनोगतात प्रा. युवराज महालिंगे यांनी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक उपक्रमांमध्ये अधिकाधिक सहभागी व्हावे, असे आवाहन केले. खडतर परिस्थितीतून मोठी माणसे घडतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांचे जीवन होय, असे त्यांनी सांगितले. विज्ञानातील संशोधनाचे महत्त्व अधोरेखित करताना आचार्य रे यांच्या “परकीय वस्तूंवर अवलंबून असलेला देश कधीही पूर्णपणे स्वतंत्र होऊ शकत नाही” या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी Bengal Chemical and Pharmaceutical Works या भारतातील पहिल्या स्वदेशी रासायनिक व औषधनिर्मिती उद्योगाची स्थापना केली, याचा उल्लेख केला. तसेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत भारतीय ज्ञानपरंपरा आणि प्रायोगिक शिक्षणावर विशेष भर दिला पाहिजे, असे त्यांनी प्रतिपादन केले.रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्यामराव डिसले यांनी आचार्य रे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी केवळ उत्तरे पाठ न करता प्रश्न विचारण्याची सवय लावली पाहिजे. प्रयोगशाळेत स्वतः प्रयोग करून चुका करण्यास प्रोत्साहन देणे, म्हणजेच Research-based Learning होय, असे त्यांनी सांगितले.
आचार्य रे यांनी लिहिलेला A History of Hindu Chemistry हा ग्रंथ प्राचीन भारतातील रसायनशास्त्राची समृद्ध परंपरा जगासमोर आणणारा ठरला, असेही त्यांनी नमूद केले. संकटे आली तरी शिक्षण आणि जिज्ञासू वृत्ती कधीही सोडू नये, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. महादेव माने यांनी भारतीय शास्त्रज्ञांच्या योगदानाचे महत्त्व विशद केले, तर प्रा. कृष्णन मोहिते यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून रसायनशास्त्राचे दैनंदिन जीवनातील महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमादरम्यान कु. तन्वी शिर्के आणि कु. सृष्टी गुडेकर या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त करून आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांच्या जीवनातून मिळणारी प्रेरणा आणि आजच्या काळातील रसायनशास्त्राचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी प्रा. जळवी मॅडम आणि प्रा. रोहिणी कदम यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. कपिल गडेकर, प्रा. अक्षय जाधव, गुरु सावंत आणि विलास कदम यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हेमंत गावित यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. अविनाश पोरे यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












