आरोग्य व्यवस्था लोकाभिमुख करण्यासाठी आरोग्य शिबिरांची आवश्यकता……….तुकाराम (दादा) साईल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष

स्थानिक निधी लेखापरीक्षण दिनानिमित्त सविता आश्रमात आरोग्य शिबिर उत्साहात

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक निधी लेखापरीक्षण विभाग, वित्त विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सौजन्याने स्थानिक निधी लेखापरीक्षण दिनानिमित्त संविता आश्रम, पणदूर येथे १ ऑगस्ट २०२६ रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला स्थानिक नागरिकांसह आश्रमातील रहिवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तुकाराम (दादा) साईल यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख करण्यासाठी अशा आरोग्य शिबिरांची आवश्यकता आहे. शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून आरोग्य सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.” त्यांनी स्थानिक नागरिक, शासकीय कर्मचारी आणि विविध संस्था यांनी सविता आश्रमाशी जोडले जाऊन वाढदिवस, स्मृतिदिन व इतर सामाजिक उपक्रम आश्रमात साजरे करावेत, असे आवाहन केले. तसेच जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून आश्रमाला आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांनी आपल्या मनोगतात सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक निधी लेखापरीक्षण विभागाच्या या सामाजिक उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले. शासकीय विभागांनी सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून अशा उपक्रमांद्वारे निराधार आणि गरजू नागरिकांपर्यंत सेवा पोहोचविणे ही प्रेरणादायी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

संविता आश्रमातील या कार्यक्रमा दरम्यान स्थानिक निधी लेखापरीक्षण विभागाचे सहाय्यक संचालक श्री चाटे यांचा संस्थेचे विश्वस्त रामचंद्र अडसुळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ प्रदान करून सन्मान करण्यात आला. या वेळी पणदूरच्या सरपंच पल्लवी पणदूरकर, विश्वस्त जितेंद्र परब, किसन चौरे, समन्वयक शैलेन्द्र कदम यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणेचे मोलाचे सहकार्य लाभले. उपस्थितांनी अशा समाजोपयोगी उपक्रमांचे नियमित आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

error: Content is protected !!