हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या ८ व्या स्मृतिदिनानिमित्त ७ ऑगस्ट रोजी विजेत्यांचा होणार गौरव
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडीचे वीरसुपुत्र हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या ८ व्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने विजय रावराणे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खुल्या जिल्हास्तरीय समरगीत गायन स्पर्धा आणि निबंध लेखन स्पर्धेला सिंधुदुर्ग जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. निबंध लेखन स्पर्धेसाठी ‘हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे : शौर्य, शिस्त आणि समर्पण’ हा विषय देण्यात आला होता. या स्पर्धेत कु. ऋतुजा संतोष मोरे हिने प्रथम क्रमांक पटकावला. शरदचंद्र सच्चिदानंद रावराणे यांनी द्वितीय, तर अन्वी चेतन गवाणकर हिने तृतीय क्रमांक मिळविला.
जिल्हास्तरीय समरगीत गायन स्पर्धेत रियाज बॅंड लाईव्ह, कणकवली यांनी प्रथम क्रमांक पटकावला. शिवाजी इंग्लिश स्कूल, पणदूर यांनी द्वितीय, तर नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल, नडगिवे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. तसेच आदर्श संगीत विद्यालय, कणकवली, श्री स्वामी समर्थ संगीत समूह, कणकवली आणि श्री कोटेश्वर संगीत साधना मंडळ, कणकवली यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके प्राप्त केली. समरगीत गायन स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्रीधर किसन पाचंगे, विकास दत्ताराम नर आणि योगेश गंगाराम चव्हाण यांनी जबाबदारी पार पाडली. निबंध लेखन स्पर्धेचे परीक्षण राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रा. एस. बी. शिंदे यांनी केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून गीतगायन स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला. स्पर्धेतील सर्व विजेत्यांचा सन्मान शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या ८ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करून करण्यात येणार आहे.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व सहभागी, मार्गदर्शक शिक्षक, परीक्षक आणि विजेत्यांचे विजय रावराणे मित्र मंडळाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून, या उपक्रमामुळे देशभक्ती, शौर्य आणि राष्ट्रप्रेमाच्या मूल्यांचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली. यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, भैरी भवानी प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष समिर रावराणे, दिपक रावराणे, आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.आर.चव्हाण, मुख्याध्यापक भास्कर नादकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. विजय रावराणे आणि मित्र मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे नियोजन आणि व्यवस्थापन मंदार चोरगे यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार निलेश कारेकर यांनी केले.












