वैभववाडी (प्रतिनिधी) : करुळ घाटात बुधवारी मध्यरात्री धोकादायक वळणावर एक कंटेनर अचानक बंद पडल्याने घाटमार्गावरील वाहतूक तब्बल अडीच तास ठप्प झाली होती. त्यामुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घाटात पडणारा पाऊस आणि दाट धुके यामुळे शेकडो प्रवाशांना मध्यरात्री मोठा मनस्ताप सहन करावा लागला. बुधवारी रात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास गगनबावड्यापासून काही अंतरावर असलेल्या करूळ घाटातील तीव्र वळणावर कंटेनरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. कंटेनर रस्त्याच्या मध्यभागीच थांबल्याने घाटमार्ग पूर्णपणे बंद झाला. काही मिनिटांतच दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा वाढू लागल्या. अडकलेल्या वाहनचालकांनी तातडीने वैभववाडी आणि गगनबावडा पोलीस ठाण्यांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वैभववाडीचे तहसीलदार सूर्यकांत पाटील, पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर तसेच महसूल व पोलीस प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जे.सी.बीच्या साहाय्याने बंद पडलेला कंटेनर रस्त्याच्या कडेला हलविण्यात आला. त्यानंतर पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घाटमार्गावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आणि हळूहळू वाहतूक पूर्ववत झाली.
करुळ घाटात मध्यरात्री कंटेनर बंद; अडीच तास वाहतूक ठप्प












