कणकवली गंगोमंदिर परिसरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव; नगरपंचायतीने तातडीने लक्ष देण्याची मागणी

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील गंगोमंदिर परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत मोठ्या संख्येने कुत्रे वावरत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. रस्ता ओलांडताना किंवा वाहनांच्या मध्ये अचानक कुत्रे आल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. तसेच या परिसरातून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांनाही कुत्र्यांमुळे त्रास सहन करावा लागत आहे.

लहान मुलांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही नागरिकांकडून कुत्र्यांना बिस्किटे व इतर खाद्यपदार्थ दिले जात असल्याने या ठिकाणी कुत्र्यांची संख्या वाढली असून ते समूहाने नागरिकांभोवती घेराव घालत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

स्थानिक नागरिकांनी या समस्येकडे कणकवली नगरपंचायत प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कुत्र्यांचे निर्बिजीकरण, लसीकरण तसेच योग्य व्यवस्थापन करण्याची गरज व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!