कुडाळ (प्रतिनिधी) : येथील ओंमकार कुडाळकर यांनी सालईवाडा, सावंतवाडी येथील मारियन डिसोजा यांच्याशी केलेल्या जमीन खरेदीच्या व्यवहारापोटी दहा लाख रुपये ऍडव्हान्स अदा केले होते.ठरलेला जमिनीचा व्यवहार पूर्ण न करु शकल्याने श्री कुडाळकर यांनी डिसोझा यांना ऍडव्हान्स दिलेली दहा लाख रुपये रक्कम परत करण्याची मागणी केली. तेव्हा डिसोजा यांनी कुडाळकर यांना सदर रकमेचा चेक दिला.सदर चेक न वटल्याने श्री कुडाळकर यांनी कुडाळ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात चेक अनादर प्रकरणी फौजदारी खटला श्री डिसोजा यांच्याविरुद्ध दाखल केला होता.
सदर खटल्याची गुणदोषावर चौकशी होऊन आरोपी मारीयन डिसोजा यांना कुडाळ येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मान.श्रीमती नम्रता बकरे यांनी, गुन्हा शाबित झाल्याने चलनक्षम दस्तऐवजाच्या कायद्यान्वये दोषी ठरवून, शिक्षा सुनावली आहे आरोपीला तीन महिन्याची साधी कैद तसेच निकालापासून ३० दिवसात बारा लाख रुपये नुकसान भरपाईची रक्कम मे.कोर्टात भरणा करण्याचे आदेश दिले आहेत.सदर रक्कम भरणा केल्यावर फिर्यादीस अदा करण्यासंदर्भातही हुकूम केला आहे. फिर्यादी ओंकार कुडाळकर यांच्या वतीने अँड. दीपक अंधारी यांनी काम पाहिले.












