कुणकेश्वर-कातवण जि.प. शाळेचा ७९ वा वर्धापन दिन उत्साहात
देवगड (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांनी आयुष्यात मोठे ध्येय ठेवून शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधली पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याने सनदी अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यासाठी जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण परिश्रम घेतले तर यश निश्चित मिळते. आयुष्यात कोणतेही ध्येय गाठण्यासाठी स्पष्ट उद्दिष्ट असणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आजपासूनच सनदी अधिकारी बनण्याचे ध्येय ठेवून त्यादृष्टीने वाटचाल करावी, असे प्रतिपादन देवगड पंचायत समितीचे उपसभापती अमोल लोके यांनी केले.
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, कुणकेश्वर-कातवण येथील ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी अमोल लोके पुढे म्हणाले की, “लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, जसा आकार द्यावा तशी मूर्ती घडते,” या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांबरोबरच पालकांची भूमिकाही अत्यंत महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार, शिस्त, अभ्यासाची आवड आणि सामाजिक जाण निर्माण करण्यासाठी पालकांनीही शिक्षकांना सहकार्य करणे गरजेचे आहे.
देवगड पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांना आवश्यक त्या शैक्षणिक व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी पंचायत समिती कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
कुणकेश्वर पंचायत समिती गणातून जनतेने मला भरघोस मतांनी निवडून दिले आहे. त्यामुळे या भागातील विकासाच्या गरजा मला चांगल्या प्रकारे माहिती आहेत. शिक्षण, सामाजिक विकास आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी भविष्यातही प्रामाणिकपणे काम करत राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
विद्यार्थ्यांनी मोबाईलसारख्या आकर्षणांपासून दूर राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, शिक्षकांचा आदर करावा आणि पालकांच्या मार्गदर्शनाखाली उज्ज्वल भविष्य घडवावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.












