सावंतवाडी (प्रतिनिधी) : आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी निपाणी येथून आलेल्या एका पर्यटकाचा महादेवगड पॉईंटवरून सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला होता. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली होती. डॉ. आयुब सय्यद (वय ४५, रा. जत्राट, निपाणी, जि. बेळगाव) असे दरीत कोसळलेल्या पर्यटकाचे नाव होते. आज पहाटेपासून शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. सकाळी मृतदेह आढळून आला होता. दुपारच्या सुमारास खोल दरीतून हा मृतदेह बाहेर काढण्यात सह्याद्री एडवेंचर रेस्क्यू ग्रुप आंबोली-सांगलीला यश मिळाले आहे.
मयत डॉ. आयुब सय्यद हे आपल्या नऊ सहकाऱ्यांसोबत मंगळवारी आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी आले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास महादेवगड पॉईंट परिसरात असताना ते लघुशंकेसाठी दरीच्या बाजूला असलेल्या सुरक्षेच्या रेलिंगवरून पलीकडे गेले. या दरम्यान अचानक तोल गेल्याने ते थेट ४०० फूट खोल दरीत कोसळले. पॉईंटवर मक्याची कणसे विकणाऱ्या एका स्थानिक विक्रेत्याने त्यांना दरीत कोसळताना पाहिले आणि तात्काळ त्यांच्या सहकाऱ्यांना या अपघाताची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम घटनास्थळी दाखल झाले. आंबोली पोलीस संतोष गलोलेंसह पथक घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी आंबोलीतील ‘सह्याद्री अॅडव्हेंचर रेस्क्यू टीम’ला मदतीसाठी पाचारण केले. रेस्क्यू टीम आणि पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम हाती घेतली होती. मात्र, परिसरात सुरू असणारा संततधार पाऊस, दाट धुके आणि अंधारामुळे सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ही शोधमोहीम तात्पुरती थांबवावी लागली होती. संबंधित पर्यटक पारपोली येथील सिद्धेश्वर मंदिरापासून सुमारे दोनशे फूट पुढे असलेल्या जंगल भागात कोसळला असण्याची शक्यता होती. अपघात घडला त्या ठिकाणी संबंधित व्यक्तीचा मोबाईल वरच राहिला असल्याने मोबाईल लोकेशनच्या आधारे शोध घेणे अशक्य झाले होते. या प्रतिकूल परिस्थितीमुळे मंगळवारी सायंकाळी थांबवण्यात आलेली रेस्क्यू मोहीम बुधवारी पहाटे पुन्हा सुरू करण्यात आली. त्यानंतर दहाच्या सुमारास मृतदेह खोल दरीत आढळून आला. दुपारी साडेबाराच्या सुमारास हा मृतदेह खोल दरीतून बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आले. यात सह्याद्री एडवेंचर रेस्क्यू ग्रुप आंबोली सांगलीच्या ऑपरेशन रेस्क्यूमध्ये बाबल आल्मेडा, मायकल डिसोजा, संतान आल्मेडा, उत्तम नार्वेकर, लॉरेन्स आल्मेडा, राजू राऊळ, प्रथमेश गावडे, पासकु देसा, अजित नार्वेकर, समीर गावडे, आनंद गावडे, विशाल बांदेकर, प्रतीक मोहिते, नारायण चव्हाण, शुभम कळसुलकर, सर्वेश नाईक, मनीष नार्वेकर, वामन पालेकर, राकेश अमरुस्कर, दीपक मेस्त्री, अजित गावडे, रघुनाथ सावंत, अभिजित नार्वेकर, हेमंत नार्वेकर यांनी सहभाग घेतला होता.












