गणेश तरुण मंडळ फोंडाघाट तर्फे विविध उपक्रमांनी गणेशोत्सव संपन्न !

भाविक लाडक्या बाप्पा पुढे नतमस्तक !

पो. निरीक्षक कमलेश बच्छाव आणि टीमच्या निगराणीखाली ” फोंडाघाट राजा ” चे शांततेत विसर्जन !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट एसटी स्टँड समोरल नाक्यावर गणेश तरुण मंडळांने बसविलेल्या फोंडाघाट महागणपतीचे विसर्जन सातव्या दिवशी डीजेला फाटा देत, सिंधुगर्जना ढोल ताशांच्या निनादात, बँडच्या तालावर, फटाक्यांच्या आतषबाजीत, उगवाई नदीवर आरती, गाऱ्हाणे होऊन करण्यात आले. संवेदनशील गावातील वाहतूक कोंडी आणि गर्दी यांच्या पार्श्वभूमीवर यावेळी पो. नि. कमलेश बच्छाव आणि त्यांच्या सर्व टीम सहकार्यांनी या मिरवणुकीवर नियंत्रण ठेवून, बाप्पाचे विसर्जन शांततेत आणि सुव्यवस्थेत करण्यास मंडळाला आणि वाहन चालकांना सहकार्य केले….

गणेशोत्सव दरम्यान गणेश तरुण मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते यांच्या सुटसुटीत नियोजनबद्ध कार्यक्रमात, श्रींची पूजा अर्चासह, स्थानिक भजन मंडळांना व्यासपीठ मिळवून दिले. एक दिवस गावातील रुग्णांसाठी मंडळ आणि संजीवनी हॉस्पिटल कणकवली मार्फत, मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये डॉ. विद्याधर तायशेटे, डॉ. सुहास तायशेटे, डॉ. समीर रावराणे यांनी सहभाग घेतला. शिबिराच्या गावातील असंख्य रुग्णांनी लाभ घेतला.

आपल्या इच्छा पूर्ण करणारा आणि विघ्नविनाशक अशी ख्याती असलेल्या फोंडाघाटचा राजा च्या ठिकाणी दर्शनासाठी गेले सहा दिवस पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली होती. त्यातच गावचे सुपुत्र सौरभ भोगटे आणि सहकाऱ्यांनी तयार केलेल्या या महाराजाच्या मूर्तीची कलाकारी चे कौतुक होत होते. अखंड दिवसभर बापाची भक्तीगीते, भजनांची धून यामुळे हा परिसर एकात्मतेसह भक्ती, श्रद्धा, आणि परंपरेचे दर्शन घडवत होता….

error: Content is protected !!