कणकवली (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत घेण्यात आलेल्या उत्कृष्ट परसबाग स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा दारिस्ते नं. ३ या प्रशालेने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. यानिमित्त यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक स्नेहा तायशेटे, उपशिक्षक नितीन सातवसे आणि शालेय व्यवस्थापन समिती, पालक आणि ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. प्रशालेतील पहिली ते चौथीच्या मुलांनी शिक्षक आणि पालकांच्या मदतीने ही परसबाग विकसित केली आहे. केंद्र आणि प्रभाग स्तरावर दारिस्ते नं. ३ प्रशालेने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे तर तालुकास्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.


प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत जिल्हा परिषद शाळा दारिस्ते नं. ३ या प्रशालेत शाळा व्यवस्थापन समिती, पालक व शिक्षक यांनी संयुक्त प्रयत्नाने परसबागा विकसित केली आहे. विकसित करण्यात आलेल्या परसबागेतील उत्पादीत भाजीपाल्याचा समावेश आहारामध्ये करण्यात येतो. तसेच मुलांना शालेय परिसरात परसबाग विकसित केल्यामुळे विविध भाज्या आणि फळे वाढवण्याची संधी मिळते. सोबतच त्यांना लहान वयातच चांगला व पोषणयुक्त आहार घेण्याची सवय लागते जी आयुष्यभर राहून निसर्ग व पर्यावरणाशी विद्यार्थी एकरुप होण्यास सहाय्य्यभुत ठरत आहे. सोबतच रोपवाटिका देखील प्रशालेच्या आवारात विकसित करण्यात आली आहे. तसेच गांडूळ खत निर्मितीही प्रशालेच्या आवारात करण्यात येते. या परसबागेची गटशिक्षणाधिकारी किशोर गवस यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पाहणी करून विद्यार्थ्यांच्या कामाचे कौतुक केले होते.














