“शिक्षकांचा प्रतिनिधी हा शिक्षकच असला पाहिजे….. “आमदार नितेश राणे

आमदारांनी खारेपाटण हायस्कूल येथील शिक्षकांशी साधला संवाद

खारेपाटण (प्रतिनिधी) : ” शिक्षकांचे प्रश्न जर खऱ्या अर्थाने सोडवायचे असतील किंवा त्यांच्या अनेक प्रलंबीत प्रश्नांना न्याय द्यायचा असेल तर विधानसभेमध्ये शिक्षक मतदार संघातून निवडून जाणारा शिक्षकांचा प्रतिनिधी हा शिक्षकच असला पाहिजे.”असे भावपूर्ण उदगार भजपा आमदार नितेश राणे यांनी खारेपाटण हायस्कूल येथे कोकण विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांशी संवाद साधताना काढले.

कोकण विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकी करीता भारतीय जनता पार्टी व बाळासाहेबाची शिवसेना पुरस्कृत उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारार्थ खारेपाटण येथील शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालयात आज प्रजासत्ताक दिनी आमदार नितेश राणे यांनी येथील शिक्षकाची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांचासमवेत भाजप कणकवली तालुका प्रमुख संतोष कानडे, माजी सभापती मनोज रावराणे, दिलीप तळेकर माजी जि.प सदस्य रवींद्र उर्फ बाळा जठार, माजी सरपंच रमाकांत राऊत, भाजप कार्यकर्ते रवींद्र शेट्ये, भाऊ राणे, सूर्यकांत भालेकर, राजेंद्र वरूणकर, तृप्ती माळवदे आदि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण या संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांच्या शुभहस्ते आमदार नितेश राणे यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. तर खारेपाटण हायस्कूलचे मुख्याधयापक संजय सानप यांनी प्रास्ताविक केले. “शिक्षकांचे वेतनाचे प्रश्न, विनाअनुदानित शाळांचे व त्यातील शिक्षकांच्या वेतनाचे प्रश्न तसेच शिक्षकाच्या जुनी पेन्शन योजना बाबतचे प्रश्न संस्थाचालक व त्यांच्या मागण्या या सोडवायच्या असतील तर कोकण विभाग शिक्षक मतदार संघातील आमदार म्हणून भाजप उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना निवडून देणे गरजेचे असल्याचे आमदार नितेश राणे यांनी यावेळी सांगितले.”
यावेळी खारेपाटण हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सानप, अध्यक्ष प्रवीण लोकरे, शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी हेमंत वाळके यांनी मनोगत व्यक्त केले. तर शाळेचे शिक्षक गुरसाळे सर यांनी सर्वांचे आभार मानले.

error: Content is protected !!