देवीची विधिवत पूजा-अर्चा; कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते आमदार प्रमोद जठार यांचा सन्मान
कणकवली (प्रतिनिधी) : नवरात्रोत्सवानिमित्त कणकवली शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, कणकवली बाजारपेठ मित्रमंडळाच्या वतीने प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या आई भवानीच्या दर्शनासाठी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह भाविकांची गर्दी होत आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार प्रमोद जठार यांनी सहकुटुंब कणकवली बाजारपेठेच्या आई भवानीचे दर्शन घेत देवीची विधिवत पूजा-अर्चा केली.
यावेळी आमदार प्रमोद जठार यांच्या समवेत त्यांच्या पत्नी नीरजा जठार उपस्थित होत्या. त्यांनी आई भवानीच्या चरणी नतमस्तक होत देवीचे दर्शन घेतले. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमांमुळे कणकवली बाजारपेठ परिसरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे.
यावेळी कणकवलीच्या नगराध्यक्ष संदेश पारकर, भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे, कन्हैया पारकर, प्रसाद अंधारी, नगरसेवक लुकेश कांबळे, नीलम पालव, सौरभ पारकर, समृद्धी पारकर, अमेय पारकर, वैभव मालडकर,अमित मयेकर, बाबू बांदिवडेकर , तेजस नार्वेकर, सर्वेश शिरसाठ, तन्मय नार्वेकर,आदी मान्यवर उपस्थित होते.
नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते सन्मान
आई भवानीच्या दर्शनानंतर कणकवली बाजारपेठ मित्रमंडळाच्या वतीने आमदार प्रमोद जठार यांचा सन्मान करण्यात आला. कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन जठार यांचा सत्कार केला.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने विविध मान्यवरांकडून देवीचे दर्शन घेतले जात असून, बाजारपेठ मित्रमंडळाच्या धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांमुळे उत्सवाची रंगत अधिकच वाढली आहे. भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात कणकवलीतील नवरात्रोत्सव साजरा होत आहे.












