विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी डॉ.श्रीप्रसाद रानडे यांचा स्तुत्य उपक्रम;

शेठ न . म. विद्यालय खारेपाटण ला प्रथमोपचार पेटी भेट

खारेपाटण (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षितता आणि शालेय परिसरातील वैद्यकीय सुविधा यांना प्राधान्य देत खारेपाटण येथील डॉ. श्रीप्रसाद रानडे यांनी शेठ न.म.विद्यालय खारेपाटण प्रशालेस प्रथमोपचार पेटी (First Aid Kit) भेट देऊन एक स्तुत्य सामाजिक उपक्रम नुकताच राबविला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

खारेपाटण हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री संजय सानप यांचेकडे नुकतीच ही प्रथमोपचार पेटी डॉ रानडे यांनी सुपूर्द केली.यावेळी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव महेश कोळसुलकर, खारेपाटण केंद्राचे केंद्रप्रमुख सचिन जायभाय आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी खारेपाटण हायस्कूल व शिक्षण संस्थेच्या वतीने डॉ रानडे यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

शाळेमध्ये शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना अनेकदा किरकोळ दुखापती, पडणे, जखम होणे, अचानक चक्कर येणे किंवा इतर आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा वेळी विद्यार्थ्यांना वेळेत प्राथमिक उपचार मिळणे अत्यंत आवश्यक असते. ही गरज लक्षात घेऊन डॉ. श्रीप्रसाद राणे यांनी सामाजिक बांधिलकी जपत प्रशालेस प्रथमोपचार पेटी उपलब्ध करून दिली आहे.

या प्रथमोपचार पेटीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांना गरजेच्या वेळी तातडीने प्राथमिक उपचार देणे शक्य होणार आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने केलेली ही छोटीशी मदत विद्यार्थ्यांच्या दृष्टीने मोठे योगदान ठरणार असल्याचे यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक संजय सानप यांनी सांगितले. शिक्षण क्षेत्राला सामाजिक सहकार्याची जोड देणारा डॉ. श्रीप्रसाद राणे यांचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला आहे.

error: Content is protected !!