मुंबई (प्रतिनिधी) : संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचे औचित्य साधत २८ मे रोजी ७५ रुपयांचे विशेष नाणे जारी केले जाणार असल्याची माहिती केंद्र सरकारकडून आज शुक्रवारी देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे २८ मे रोजी उद्घाटन होणार आहे. या अविस्मरणीय क्षणाच्या स्मरणार्थ अर्थ मंत्रालयाकडून ७५ रुपयांचे नाणे लाँच केले जाणार आहे. नव्याने जारी केले जाणारे ७५ रुपयांचे नाणे वर्तुळाकार असणार आहे, त्याचा व्यास ४४ मिलिमीटर इतका राहील. हे नाणे तयार करण्यासाठी ५० टक्के चांदी, ४० टक्के तांबे, ५ टक्के निकेल व ५ टक्के झिंक वापरण्यात आले आहे. नाण्याच्या एका बाजूला मध्यभागी अशोक स्तंभाचे चित्र असेल. त्याखाली ‘सत्यमेव जयते’ लिहिलेले असेल. डाव्या बाजूला देवनागरी भाषेत ‘भारत’ तर उजव्या बाजूला इंग्रजीमध्ये ‘इंडिया’ असे लिहिलेले असेल. तर ७५ रूपयांच्या नाण्याच्या दुसऱ्या बाजूला संसद भवन कॉम्प्लेक्सचे चित्र असेल. याच्या शेजारी आजूबाजूला ‘संसद संकुल’ असे देवनागरी आणि इंग्रजी भाषेत लिहिलेले असेल, असे देखील अर्थ मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.