वैभववाडी (प्रतिनिधी) : माघी गणेश जयंती निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या उत्तर सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क अध्यक्ष सिद्धी संतोष नारकर यांच्या वतीने मोफत वैद्यकीय शिबिराचे मांगवली सिद्धवाडी येथे आयोजन करण्यात आले होते. या मेडिकल कॅम्पला शेकडो संख्येने ग्रामस्थांनी उपस्थिती दाखवली आणि लाभ घेतला. या शिबिरामध्ये ग्रामस्थांची वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी आणि मार्गदर्शन करण्यात आले.
हे शिबीर जिल्हा रुग्णालय कणकवली येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. धर्माधिकारी आणि डॉ. पवार यांच्या निरीक्षणाखाली यशस्वीरित्या पार पडले. यावेळी मनसे उपनेते, माजी आमदार परशुराम उपरकर, सिंधुदुर्ग कार्यकारणी सदस्य कुणाल किणलेकर, तालुका अध्यक्ष प्रसाद गावडे, विद्यार्थी सेना उत्तर सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष निलेश मेस्त्री, कणकवली तालुका अध्यक्ष धनराज गोरे आणि गिरीश उपरकर आदी उपस्थित होते.


















