कुडाळ पोलीस स्टेशनचे एपीआय मनोज पाटील यांची बदली करा !

राजकीय पदाधिकाऱ्यांची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी

कुडाळ (अमाेल गाेसावी) : कुडाळ पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले एपीआय मनोज पाटील यांची वागणूक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी तसेच सर्वसामान्य जनतेशी अरेरावीची उद्धट स्वरुपाची असते. नेहमी सरकारी कामात अडथळा कलम ३५३ दाखल करण्याची धमकी ते सर्वांना देत असतात. त्यामुळे त्यांची कुडाळ तालुक्याबाहेर बदली करावी, अशी मागणी तालुक्यातल्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. याबाबत पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव, हेमंत उर्फ काका कुडाळकर, राष्ट्रीय काँग्रेसचे कुडाळ तालुका अध्यक्ष अभय तुकाराम शिरसाट, ठाकरे गट शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष धीरज परब, सरंबळ सरपंच रावजी कदम, योगेश श्याम नाईक आणि राष्ट्रवादीचे प्रसाद गजानन रेगे यांच्या सह्या आहेत.

या निवेदनात म्हटले आहे की, मनोज पाटील यांच्याबाबत अनेक तक्रारी असून गेल्या वेळी हॉटेल कृष्णा सागर येथे गोवा बनावटीची दारू पकडली होती. त्यावेळी गुन्हा न दाखल करता परस्पर दारूची विक्री केली होती. हे प्रकरण वृत्तपत्रात आल्यानंतर मिटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचप्रमाणे तहसीलदार यांनी केलेल्या एका तक्रारीवरून दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये कुडाळ तालुक्यातील अनेक जणांना फोन करून आपले नाव या गुन्ह्यात आहे असे सांगून प्रत्येक व्यक्तीकडून २० ते ४५ हजार रक्कम जवळजवळ ३० ते ३५ जणांकडून वसूल करण्यात आली. काही प्रकरणात चार्जशीट दाखल झाल्यानंतर सुद्धा फिर्यादी किंवा आरोपींना बोलवून त्यांना त्रास देण्याचे काम सातत्याने मनोज पाटील यांच्याकडून होत आहे. कुडाळ तालुक्यातील सरंबळ गावचे सरपंच रावजी कदम यांना धमकावून व धक्का देत कस्टडीकडे नेऊन एका कोपऱ्यात उभे राहण्याची नाहीतर आपणाला आत टाकणार अशी धमकी दिली. तसेच कुडाळचे माजी नगराध्यक्ष ओंकार तेली हे एक प्रकरणात गेले असता तुमच्यावर सरकारी कामात अडथळा ३५३ केस दाखल करू असे सांगितले. तसेच अलीकडेच धीरज परब यांनी फिर्यादीची एफआयआर दाखल करून घ्या, अशी विनंती केली असता त्यांच्यावर सुद्धा सरकारी कामात अडथळा अशी माझी तक्रार देतो अशी धमकी दिली व उद्धट वक्तव्य केले. तरी अशा या उद्धट बेशिस्त अधिकाऱ्याची तत्काळ बदली कुडाळ तालुक्याच्या बाहेर व्हावी अशी विनंती या राजकीय पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

error: Content is protected !!