सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): कृषी क्षेत्राची पदवी घेवून नोकरी करण्याचे स्वप्न बघण्यापेक्षा नोकरी पुरविणारे बना. कृषी आधारित व्यवसाय सुरू करून मालक बना, असा सल्ला कोकण कृषी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू तथा सिंधुदुर्ग पुत्र डॉ संजय भावे यांनी कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना केले. सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान किर्लोस, कृषी विज्ञान केंद्र किर्लोस आणि छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस सिंधुदुर्गनगरी यांच्या संयुक्त विद्यमाने कुलगुरू भावे यांचा जाहीर सत्कार सिंधुदुर्गनगरी येथील छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ भावे यांनी वरील आवाहन केले. यावेळी ब्रिगेडियर सुधीर सावंत, परिवेक्षाधिन सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री, उप वनरक्षक नवल किशोर रेड्डी, प्रभारी जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री नाईक, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, जिल्हा बँक मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, प्राचार्य योगेश पेडणेकर, शास्त्रज्ञ डॉ भास्कर काजरेकर यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.