कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरावस्था दूर करा अन्यथा उपोषण

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील कळसुली गावात असलेल्या आणि आजूबाजूच्या गावांना जीवनसंजीवनी ठरणाऱ्या कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्राची दैनावस्था आणि समस्यांमध्ये वारंवार वाढ होत चालली आहे. अनेक वेळा आंदोलने उपोषणे होऊन देखील कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दैनावस्था व वाढत्या समस्यांचा आलेख मात्र चढत्या क्रमांकाला असलेला पाहायला मिळतो. तब्बल ५० हुन अधिक दिवस आरोग्य केंद्रातील रुग्ण पाण्याविना होते. गावातील लोकांच्या सहकार्याने प्रत्येकाने मदत करून कसे बसे आजपर्यंत दिवस काढले. मात्र याकडे आपली जबाबदारी म्हणून कोणत्याही अधिकाऱ्यांनी पाहिले नाही. त्यामुळे आरोग्य केंद्राची दैनावस्था व समस्या वाढत गेले. कळसुलीसह बोर्डवे, ओसरगाव, वागदे, कसवण – तळवडे, हळवल, शिरवल, शिवडाव सह आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांच्यावतीने कणकवली प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तसेच वाढत चाललेल्या समस्यांची पाहाणी करून समस्या दूर करा अन्यथा ३० जून २०२३ रोजी ग्रामस्थांच्यावतीने उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी जगदीश कातकरी प्रांताधिकारी कणकवली, तहसीलदार आर. जे. पवार, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, पोलीस ठाणे कणकवली यांना निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदन देताना रुजाय फर्नांडिस, बळीराम सावंत, विराज गोसावी, कृष्णा चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते बबली राणे, माजी सरपंच अर्जुन देसाई,संतोष दळवी, आदी ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रात बि. ए. एम. एस डॉक्टर नको असून एम. बी. बी. एस डॉक्टर नियुक्त करा, औषध निर्माता अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आदि रिक्त पदे तातडीने भरा, ४० दिवस झाले तरी होणाऱ्या पाणी टंचाईवर तोडगा काढला नाही त्यामुळे कर्मचारी व रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर स्वच्छता मोठ्या पावसापूर्वी करा, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी दूर राहत असल्याने अतिगंभीर रुग्णांना योग्य वेळी उपचार मिळत नाहीत, प्राथमिक आरोग्य केंद्राचा मुख्य दरवाजा लोखंडी गेट तुटुन बरीच वर्षे झाली परंतु तो गेट अद्यापही दुरुस्त केलेला नाही. उपकेंद्र दिंडवणे येथे लाखों रुपये खर्च घालून उभारलेल्या ईमारती मध्ये कर्मचारी कायमस्वरूपी थांबत नाहीत, कळसुली प्रा. आरोग्य केंद्रांची ईमारत जीर्ण झाली आहे, नव्याने ईमारत उभारणी व्हावी पाठपुरावा करावा,कर्मचारी रहतात त्या कॉटर्सची देखभाल होत नाही, सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर देखील परिसरात वाढलेला आहे, रामभरोसे कारभार सुरू आहे, PM रूम गंजून गेला, सिरिंज जाळण्यासाठी शोषखड्डा नाही, ड्युटीला असणाऱ्या कर्मचाऱ्यांची ड्यूटी लिस्टचा फलक लावा, कॉटर्स लगत असलेली झाडी धोकादायक असून तातडीने तोडा, गरोदर महिलांना गरम पाणी द्यावे, बंद असलेला इन्व्हर्टर सुरू करा,रात्रीच्या वेळी नाईट ड्युटीला असलेले शिपाई प्राथमिक आरोग्य केंद्रात थांबत नाहीत, प्रा. आरोग्य केंद्रात कुत्र्यांचा धुमाकुळ असतो त्याला वाली कोण.?, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारा समोर कार्यालयीन कर्मचारी व अधिकारी बेशिस्तपणे वाहणे पार्किंग करतात त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या रुग्णवाहिकांना त्रास होतो, अशा अनेक समस्या सोडवण्यासाठी निवेदन देण्यात आले. गटविकास अधिकारी श्री अरुण चव्हाण पंचायत समिती कणकवली यांचही निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले. यावेळी श्री. चव्हाण यांनी आपण प्रयत्न करून जेवढ्या शक्य तेवढ्या समस्या लवकरात लवकर सोडवू असे आश्वासन दिले. रुग्णालयात जाणवणाऱ्या पाणी टंचाईवर बिघाड झालेली यंत्रे सुधारित होईपर्यंत पर्यायी पाण्याची व्यवस्था करण्याबाबत सूचना दिल्या.

error: Content is protected !!