कुडाळ एमआयडीसी बजाज राईस मिल समोरच्या परिसरात पकडलेला तांदूळसाठा चौकशीचे पुढे काय झाले?

जिल्हा पुरवठा अधिकारी व कुडाळ तहसील कार्यालयाची भूमिका “संशयास्पद” – मनसेचा आरोप

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडे प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ एमआयडीसी बजाज राईस मिल परिसरात रस्त्यावर दि. २८-०७-२०२२ रोजी सायंकाळच्या सुमारास तांदळाने भरलेला एक ट्रक शिवसेना कार्यकर्त्यांकडून पकडण्यात आलेला होता. सदरच्या ट्रक मधील तांदूळ हा शासकीय रास्त दराच्या दुकांनांमधील असून तो पॉलिश करण्यासाठी राईस मिलमध्ये नेला जात असल्याचा आरोप करत कारवाईची मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती. यावेळी ट्रक चालकाने सदरचे धान्य लाभार्थी यांचेकडून व्यापारी यांनी विकत घेतले असून ते धान्य आरोंदा सावंतवाडी येथील खाजगी गोदामातून भरण्यात आल्याचे दिलेल्या जबाबात म्हटले होते. मात्र, आरोंदा तलाठी यांच्या चौकशी अहवालात आरोंदा परिसरात खाजगी गोदामच नसल्याचे नमूद केल्याने या प्रकरणातील संशय अधिक बळावला गेला. त्यामुळे याच्या मुळाशी जाणं गरजेचे असताना जिल्हा पुरवठा अधिकारी व कुडाळ तहसीलदार कार्यालयाने थातूर मातुर चौकशीचा फार्स दाखवून प्रकरण दडपले व यामागे मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याची शक्यता असल्याचा आरोप मनसेचे माजी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी केला आहे.

या संदर्भात अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी करणार असून यामध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी संबंधित प्रकरणाच्या अनुषंगाने जाणीवपूर्वक दुर्लक्षित केलेल्या काही गंभीर शंका उपस्थित करून चौकशी कार्यवाहीवरच सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. तहसीलदार सावंतवाडी यांनी दिलेल्या अहवालात आरोंदा परिसरात खाजगी धान्य गोडावून नाही असे नमूद आहे तर मग धान्याची उचल नेमकी कोणी व कुठून झाली, वाहन चालक खोटे बोलत आहे का, ट्रक चालकाने दिलेल्या जबाबावरून सदरचे धान्य कोकणातील लाभार्थी यांचेकडून व्यापारी यांनी विकत घेतल्याचे नमूद आहे मग धान्याची आवश्यकता नसणारे व एवढ्या मोठ्या प्रमाणात विक्री करणारे हे लाभार्थी कोण आहेत, रास्त दराचे धान्य विकत घेणारा व्यापारी कोण आहे, गरिबांसाठी मिळणारे धान्य विक्री होत असल्याने शासनाचा धान्य वितरणामागील खऱ्या उद्देशाला हरताळ फसला जातोय का, बजाज राईस मिलकडे जाणाऱ्या रस्ता परिसरात संबंधित ट्रक काय करत होता, तांदळाने भरलेला ट्रक मिल मधून बाहेर जाणे अपेक्षित असताना मिलकडे कोणत्या उद्देशाने जात होता, बजाज राईस मिलमधील सीसीटीव्ही यंत्रणा तहसीलदारांकडून तपासली गेली का, ती का तपासली गेली नाही, जिल्हा पुरवठा अधिकारी व तहसीलदार कुडाळ यांनी प्रकरण तडका फडकी निकाली काढण्यामागे आर्थिक हितसंबंध आहेत की राजकीय दबाव असे सवाल उपस्थित करत या सर्व प्रश्नांची उत्तरे जिल्हा पुरवठा अधिकारी व कुडाळ तहसीलदारांनी देणे अपेक्षित आहे.

ट्रक मधील धान्य शासकीय आहे अगर कसे हे ठरविण्यासाठी प्रबंधक ( गु.नि.) भा.खा.नि.मं.का. पनवेल यांना अहवाल सादर करणेबाबत दि. 29-07-2022 रोजीच्या पत्रानुसार कळविण्यात आले. आश्चर्याची बाब म्हणजे प्रबंधक (गु.नि.) मा.खा.नि.मं.का. पनवेल यांचेकडून अगदी त्याच दिवशी अहवाल दिल्याचे कागदपत्री आढळून येत असल्याने धान्य पडताळणी करून अहवाल देणेबाबत कोणत्या माध्यमातून कळविण्यात आले, नमुना धान्य त्यांचेपर्यंत कसे पोहचले व पडताळणी करून अहवाल अगदी त्याच दिवशी कसा प्राप्त झाला हे सारेच प्रकरण संशयास्पद आहे. जर का वाहन चालकाने दिलेला जबाब खरा मानायचा झाला तर खाजगी व्यापाऱ्याने तांदळाची केलेली साठेबाजी कायदेशीर आहे का ? धान्याचा काळा बाजार करून केलेली साठेबाजी वैध ठरते का ? पुरवठा अधिकाऱ्यांनी जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 मधील तरतुदीनुसार साठेबाजीवर कोणती कारवाई प्रस्तावित केली गेली ? असे प्रश्न अनुत्तरीत राहत असून प्रकरण दडपण्यामागे भ्रष्टाचार व राजकीय दबाव झाल्याचा आरोप करत उच्चस्तरीय चौकशी समितीद्वारे सखोल चौकशी करावी व गोरगरीब जनतेच्या वाट्याला येणाऱ्या धान्यात अपहार करणारे पडण्यामागील चेहरे जनतेसमोर आणावेत, अशी मागणी मनसेचे प्रसाद गावडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!