कुडाळ ( अमोल गोसावी ) : आम्ही कोणीही राष्ट्रवादी सोडलेली नाही. आम्ही राष्ट्रवादीतच राहणार; कालची हकालपट्टी ही हास्यास्पद गोष्ट आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक हेमंत उर्फ काका कुडाळकर यांनी आज कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे. यावेळी काका कुडाळकर म्हणाले की, शरद पवार हे आमच्यासाठी आदरणीयच राहतील. पक्षाची धुरा अजित पवार यांच्याकडेच हवी अशी आमची भूमिका आहे. मात्र, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमच्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले. त्यामुळे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादीची पिछेहाट झाली आहे. सिंधुदुर्गात पक्षाचे जिल्हाध्यक्ष हेच निष्क्रिय असल्याची खरमरीत टीका, प्रदेश संघटक काका कुडाळकर यांनी केली. जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडे जयंत पाटील यांचे लक्ष नाही, हीच महत्त्वाची बाब असल्याचेही काका कुडाळकर यांनी या पत्रकार परिषदेत आरोप करताना म्हटले आहे. वरिष्ठांनी पक्ष वाढीकडे लक्ष देणे गरजेचे होते. पण तसे झाले नाही. आपल्याकडे विभागीय अध्यक्षच नाही. राष्ट्रवादीच्या पीछेहाटीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलच जबाबदार असल्याची घणाघाती टीका काका कुडाळकर यांनी केली आहे.
*अजित पवार पक्ष वाढीसाठी प्रयत्नशील*
आमचे नेते अजित पवार हे पक्ष वाढीसाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यामुळे त्यांच्या पाठीशी आपण असल्याचे प्रतिपादन काका कुडाळकर यांनी केले. मागील कित्येक वर्षात जिल्हा कार्यकारिणी बैठक झालेली नसून हा कार्यकर्त्यांवर अन्याय आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास व्हावा म्हणून अजित पवार यांचे नेतृत्व मान्य करावे, असेही ते म्हणाले.
*सुनील तटकरे हे आमचे प्रदेशाध्यक्ष*
खासदार सुनील तटकरे हेच प्रदेशाध्यक्ष आहेत; जयंत पाटील नव्हेत. त्यामुळे कोणत्याही कारवाईला आमचा मला फरक पडत नाही. आमची पदे काढून घेण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा सुद्धा काका कुडाळकर यांनी यावेळी दिला.
आम्ही कोणीही राष्ट्रवादी सोडलेली नाही. – काका कुडाळकर












