आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी 

आमदार नितेश राणेंवर सुशांत नाईक यांची बोचरी टीका

कणकवली (प्रतिनिधी) : निओलेटर आयसीयू, सी आर्म आदी वैद्यकीय उपकरणे तसेच मेडिकल स्टाफ अभावी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णसेवेत अडचणी येत असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ धर्माधिकारी यांचे म्हणणे आहे. तर आमदार नितेश राणे क्लार्क आणि वॉर्डबॉय खाजगी एनजीओ कडून भरती करतायत. जे आवश्यक आहे असे वैद्यकीय अधिकारी उपकरणे याची पूर्तता न करता सध्या अनावश्यक असलेले नॉन मेडिकल खाजगी स्टाफ देण्याचे नितेश राणेंचे  काम म्हणजे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असल्याची बोचरी टीका युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी विधानसभा समन्वयक राजू राठोड, गीतेश भोगले, समीर आचरेकर , सिद्धेश राणे उपस्थित होते. केंद्रात आणि राज्यात आता सरकार तुमचे आहे. मग खाजगी तत्वावर वॉर्ड बॉय आणि क्लर्क भरती कशाला ? कायमस्वरूपी भरती का करत नाही ? मागील 9 वर्षे आमदार आहात. तुमचे वडील 25 वर्षे सत्तेत होते. पालकमंत्री मुख्यमंत्री असूनही त्यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयाकडे दुर्लक्ष का केले ? असा सवाल करत आमदार नितेश राणेंनी केलेली ही खाजगी भरती म्हणजे मोफत वायफाय सारखी अळवावरचे पाणी सारखी अवस्था आहे. काही दिवसांनी हे खाजगी कर्मचारी कुठे असतील हे शोधावे लागेल. त्या कर्मचाऱ्यांकडून काही चुका झाल्या तर त्याची जबाबदारी नितेश राणे घेणार काय ? असा सवाल करतानाच डॉ धर्माधिकारी यांना ऑपरेशन करण्याची गर्भित धमकी देऊन नितेश राणे त्यांचे मानसिक खच्चीकरण करत आहेत.त्यामागे डॉक्टर सरकारी हॉस्पिटलमध्ये टिकू नयेत आणि आपले पडवे येथील खाजगी हॉस्पिटल चालावे, पडवे तील खाजगी हॉस्पिटलमध्ये पेशंट यावेत यासाठी नितेश राणेंचा खटाटोप असल्याची टीकाही सुशांत नाईक यांनी केली. कणकवली विधानसभा मतदारसंघात युवासेना सर्व शासकीय रुग्णलयांत जाऊन समस्या जाणून घेत त्या दूर करण्यासाठी आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचेही नाईक म्हणाले.

error: Content is protected !!