सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर येथे दागावलेली ४१ जनावरे काळी बुरशी या आजाराने मृत झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुणे येथील प्रयोगशाळेतून लवकरच याचा अहवाल प्राप्त होणार आहे. त्यानंतर याची अंतिम स्पष्टता होणार आहे. काळी बुरशी आलेला ओला चारा जास्त प्रमाणात खाल्याने हा आजार झाला असल्याची माहिती जिल्हा बँक उपाध्यक्ष तथा भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयातील उपाध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेला जिल्हा संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत, भगीरथ प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष डॉ प्रसाद देवधर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना काळसेकर यांनी, हा प्रकार पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गंभिर घेतला असून भाजपच्या माध्यमातून दगावलेल्या प्रत्येक जनावरामागे पाच हजार रुपये आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चिंदर गावात सध्या जिल्हा परिषद यंत्रणा अहोरात्र काम करीत आहे. डॉक्टर कांबळे हे सातत्याने तीन दिवस तेथे ठाण मांडून आहेत. त्यांच्या सोबत भाजपची यंत्रणा सुद्धा वावरत असल्याचे यावेळी काळसेकर यांनी सांगितले.
उन्हाळ्यात ओला चारा नव्हता. त्यामुळे आता चारा उपलब्ध झाल्यावर या जनावरांनी मोठ्या प्रमाणात खाला. या चाऱ्यावर काळी बुरशी होती. त्यामुळे त्यांना हिमोरेजिक फिवर झाला. त्यावर लस उपलब्ध आहे. याचे लसीकरण सुरू केले आहे. परंतु या लसीचा परिणाम जाणवायला किमान सात दिवसांचा कालावधी लागतो. तात्काळ आजार बरा होत नाही, असेही यावेळी काळसेकर यांनी सांगितले.












