प्राथमिक शाळांमधील रिक्त जागांवर स्थानिक डीएड बेरोजगारांना संधी द्या

उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने जिल्हा परिषदसमोर धरणे आंदोलन

ओरोस (प्रतिनिधी) : शिक्षणमंत्री हाय हाय… ५० खोके एकदम ओके.. शिक्षक नसलेल्या शाळांना शिक्षक मिळालाच पाहिजे…! आदी घोषणा देत प्राथमिक शाळांमधील रिक्त जागांवर स्थानिक डीएड बेरोजगारांना संधी द्यावी आणि सेवानिवृत्त शिक्षकांना मानधनावर घेण्याचा निर्णय रद्द करावा या मागणीसाठी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने आज जिल्हा परिषदसमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही शिक्षक नाहीत अशा १२१ शाळा आहेत. या शाळांवर स्थानिक डीएड बीएड बेरोजगारांना संधी द्यावी अशी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची मागणी होती. याला जिल्हा परिषद प्रशासन देखील सकारात्मक होते. असे असतानाही शासनाने या रिक्त जागांवर सेवानिवृत्त शिक्षकांना मानधनावर घेण्याचे परिपत्रक काढले आहेत. त्या परिपत्रकात आपला विरोध असून स्थानिक डीएड बीएड बेरोजगारांना त्या रिक्त जागांवर संधी मिळावी यासाठी शिवसनेच्यावतीने आज जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी जिल्हा प्रमुख संजय पडते, सतीश सावंत, उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत, हरी खोबरेकर, नीलम सावंत, अतुल बंगे, बाळा गावडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सतीश सावंत मार्गदर्शन करताना म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण क्षेत्रात अग्रेसर आहे. मात्र आताचे शिक्षण मंत्री चुकीचे निर्णय घेत ह्या जिल्ह्यातील मुलांचे शैक्षणिक नुकसान करण्याचे काम करत आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत आम्ही डीएड बेरोजगारांवर अन्याय होऊ देणार नाही. प्रसंगी तीव्र आंदोलन छेडू अशा इशारा दिला.

शिकविण्याची हाव असेल तर मोफत शिकवा : प्रकाश दळवी
प्राथमिक शाळांमधील रिक्त जागांवर काम करण्यास इच्छुक असल्याबाबत ४९ सेवानिवृत्त शिक्षकांनी सहमती दर्शविली आहे. यावर बोलताना अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे माजी राज्याध्यक्ष प्रकाश दळवी यांनी या सेवानिवृत्त शिक्षकांवर खडसून टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरण शिकविण्याची क्षमता जुन्या शिक्षकांमध्ये नाही त्यामुळे आताच्या पिढीला शिवण्यासाठी सेवानिवृत्त शिक्षकांनी पुढे येऊ नये. कमी मानधनात सेवानिवृत्त शिक्षकांकडून हे शासन काम करून घेत आहे. अशा शिक्षकानं काही तरी वाटले पाहिजे निर्लज्ज सारखे काम करण्यास तयार होऊ नका असे सांगतानाच शिकविण्याची एवढीच हाव असेल तर मोफत शिकवा असे परखड मत त्यांनी यावेळी मांडले.

दोन जिल्हा प्रमुख असताना देखील उपस्थितांची संख्या कमी
उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने आज जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात शिवसेनेचे दोन जिल्हा प्रमुख, दोन उपजिल्हाप्रमुख सहभागी असतानाही शिवसैनिकांची उपस्थित कमी दिसून येत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!