आम आदमी पार्टीने शहरातील खराब रस्त्यांच्या प्रश्नाकडे वेधले लक्ष
कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : कोल्हापूरात पावसाळा आला की महापालिकेच्या रस्त्यांचे डांबर पाण्यात विरघळायला लागते. टक्केवारीच्या विळख्यात अडकलेले सुमार दर्जाचे रस्ते अगदी पाचवीलाच पूजलेले आहेत. अगदी वर्षभर आधी केलेल्या रस्त्यांची देखील चाळण झालेली आहे. यामुळे नागरिकांना ट्रॅफिक जाम सोबतच आरोग्याच्या प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर यादवनगर येथील मुख्य रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यात ‘टक्केवारीचं झाड’ लावत प्रतिकात्मक वृक्षारोपण करून आम आदमी पार्टीने शहरातील खराब रस्त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. शहरात शंभर कोटींचे रस्ते केले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते. परंतु, नवीन रस्ते तर सोडाच, वर्षभर आधी केलेल्या रस्त्यांचे डांबर देखील वाहून जात आहे. रस्त्यांचा दर्जा सुधारावा यासाठी कोणतीही सक्षम यंत्रणा महापालिकेकडे उपलब्ध नाही, एवढंच काय तर गेल्या वर्षभरापासून डांबर प्लांटची फाईल नुसता या टेबल वरून त्या टेबल वर चकरा मारत आहे. येत्या काही दिवसात जर यावर ठोस कार्यवाही झाली नाही तर आप च्या वतीने आंदोलन छेडले जाईल असा इशारा प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी दिला.
यावेळी मोईन मोकाशी, दुष्यन्त माने, जावेद पठाण, अंकुश डावाळे, प्रथमेश सूर्यवंशी, संजय नलवडे, उत्तम पाटील, अभिजित कांबळे, आनंदा डावाळे, निसार नागनूरे, राकेश गायकवाड, अजय डावाळे, मोहसीन पठाण, जुबेर महाबरी, महादेव मिस्त्री, संदीप मिस्त्री, शशांक लोखंडे, अमरसिंह दळवी, महेश घोलपे, अक्षय राऊत आदी उपस्थित होते.