” पहिली दहा वर्षे जबाबदारीने अभ्यास केलात तर पुढील ५० वर्षे सुखकर जीवन जगू शकता ” – उद्योजक दत्ता सामंत

वराडकर हायस्कूल कट्टा मध्ये बहुविध कौशल्य अभ्यासक्रमाचा शुभारंभ

चौके दि. २५ ( अमोल गोसावी ) : वराडकर हायस्कूल कट्टामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच भवितव्य घडवण्यासाठीच संस्था एवढा पुढाकार घेऊन अशा प्रकारचा नावीन्यपूर्ण उपक्रम घेण्याच धाडस करते आहे. या संस्थेतील शिक्षकांचा आत्मविश्वास पाहता ते विद्यार्थी चांगल्या पध्दतीने घडवतील यात शंका नाही. भारत मातेचे रक्षण करणारे देशसेवक कर्नल शिवानंद वराडकरांसारखे व्यक्तीमत्व या संस्थेमध्ये आहेत हे सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या जन्मानंतर शिक्षण घेण्याचा कालावधी हा आपल्या आयुष्यातील महत्वाचा आणि बेसिक कालावधी असतो. ही सुरवातीची दहा वर्षे जर तन मन धन अर्पून एकनिष्ठेने जर अभ्यास केलात तर पुढील ५० वर्षे तुम्ही चांगल्या प्रकारे जीवन जगू शकता. स्किल डेव्हलपमेंट सारखा कोर्स आठवी पासूनच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा या संस्थेचा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे बहुगुणी व्यक्तिमत्व संजय नाईक सर हे मुख्याध्यापक म्हणून या हायस्कूलला लाभले आहेत. ही संस्थेची जमेची बाजू आहे असं मी समजतो. आपल्या मागणी नुसार येणाऱ्या काळात वराडकर हायस्कूल साठी केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांच्या खासदार फंडातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी नक्की प्रयत्न करेन” असे आश्वासन देतानाच दत्ता सामंत यांनी संस्थेच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी स्वतः एक्कावन्न हजार रुपये देणगी देण्याचे जाहिर केले.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे ब्रीद घेऊन कार्यरत असणाऱ्या कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा संचलित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा , वराडकर इंग्लिश मिडीयम स्कूल कट्टा मध्ये सन २०२३ -२४ पासून इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी Cause To Connect या संस्थेच्या माध्यमातून मल्टी स्कील फाऊंडेशन कोर्स अर्थात बहुविध कौशल्य अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमाचे उद्घाटन काल मंगळवार दिनांक २५ रोजी वराडकर हायस्कूल कट्टा येथे उद्योजक श्री देवदत्त ( दत्ता ) सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यानिमित्त बोलताना श्री सामंत यांनी वरील प्रतिपादन केले.

हा उद्घाटन सोहळा कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त सेवानिवृत्त कर्नल शिवानंद वराडकर , यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर उद्घाटक देवदत्त ( दत्ता ) सामंत , कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा चे अध्यक्ष अजयराज वराडकर , सचिव सुनिल नाईक , श्रीम. विजयश्री देसाई , cause to connect चे संस्थापक अध्यक्ष , श्री. अनिरुद्ध बनसोड , खगोल अभ्यासक महेश नाईक , शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर , रविंद्रनाथ पावसकर , संचालक महेश वाईरकर, स्वाती वराडकर , सर्जेराव पाटिल, सुनिल गुराम, जयंद्रथ परब, सुरेश कदम मुख्याध्यापक संजय नाईक , ऋषी नाईक , दाभोली हायस्कूलचे मुख्याध्यापक किशोर सोन्सूरकर , आदी मान्यवर उपस्थित होते.

त्याचप्रमाणे यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्था विश्वस्त सेवानिवृत्त कर्नल शिवानंद वऱाडकर यांनी सांगितले कि , विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था नेहमीच प्रयत्नशील असते. तुमच्या आवडीनुसार या कोर्सचा फायदा करून घ्या. चांगले शिकलात तर तुम्हाला चांगले निर्णय घेता येतील म्हणून प्रशालेतील उपलब्ध उपक्रमांचे शिक्षण घेऊन स्वतःचा विकास साध्य करून घ्या. पालकांनी मुलांवर सक्ती न करता त्यांच्या आवडीनुसार करीअर निवड करण्याची संधी द्या कारण प्रत्येक मुलामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्ता असते. असे बोलून त्यांनी शाळेच्या सर्वांगीण प्रगतीबद्दल संस्था पदाधिकारी आणि शिक्षकांचे अभिनंदन करून कौतुक केले.

काळाची गरज ओळखून ” हाताला काम , श्रमाला दाम तसेच एकच शिक्षण तंत्रशिक्षण हे ब्रीद नजरेसमोर ठेवून आजपासून वराडकर हायस्कूल कट्टा मध्ये आठवी नववीच्या विद्यार्थ्यांना मल्टी स्कील फाऊंडेशन कोर्स अर्थात बहुविध कौशल्य अभ्यासक्रमांतर्गत इंजिनिअरिंग , इलेक्ट्रिक , ॲग्री , आणि फुड प्रोसेसिंग या चार कोर्समधून फॅब्रीकेशन , वेल्डींग , सोल्डरींग , थ्रेडींग , बांधकाम, सुतारकाम , इलेक्ट्रिकल , सर्वेक्षण , एनर्जी , शेतीविषयक तंत्रज्ञान , शेती संबंधित प्राणीशास्त्र तसेच कुकींग , आरोग्य , शिवणकाम , विणकाम , याविषयी तज्ञ मार्गदर्शक प्रशिक्षण देणार आहेत , आठवड्यातून एक दिवस सलग तीन तास विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. स्पर्धेच्या युगात पदवी संपादन करताना एखादे कौशल्य आत्मसात केले तर त्याचा भावी आयुष्यात फायदा होतो हाच धागा पकडून संस्थेने हा उपक्रम सुरू केला आहे. अशी माहिती संस्था अध्यक्ष अजयराज वराडकर यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पेंडूरकर ,वीणा शिरोडकर यांनी केले व आभार देवयानी गावडे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!