249.13 कोटींचा निधी प्राप्त
मुंबई (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे- वैभववाडी -करूळ घाटा पर्यंतच्या रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामासाठी केंद्र शासनाकडून 249.13 कोटी रुपयांचा निधी मिळाला असून या रस्त्याच्या कामाला 20 सप्टेंबर 2023 पासून सुरुवात होईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी विधान भवनात बोलताना दिली आहे.
तळेरे- वैभववाडी -करूळ घाटा पर्यतच्या रस्त्याची दुर्दशा झाली असून लोकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.या लोकांना आणखी काही महिने त्रास सहन करावा लागणार आहे.राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नाने या रस्त्यासाठी केंद्र शासनाकडून निधी मिळाला असून एकूण 21 किलोमीटर रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम होणार आहे,अशी माहिती संबधित्त अधिकाऱ्यांनी दिली.
249.13 कोटी रुपये मंजूर
सिंधुदुर्ग कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या तळेरे ते गगनबावडा या रा. म. क्र. 166G ची कि.मी. 00/000 ते 30/670 ही सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील लांबी या विभागाचे कार्यक्षेत्रात येते. त्यापैकी कि.मी. 6/00 ते 11/00 व गगनबावडा घाटातील कि.मी. 19/300 ते 35/300 या एकूण 21.00 कि. मी. लांबीच्या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे व पक्क्या बाजुपट्टीसह दुपदरीकरणाचे कामास केंद्रशासनाकडून वार्षिक आराखडा 2022-23 मध्ये एकूण रु. 249.13 कोटी किंमतीस मंजुरी देण्यांत आलेले आहे.
कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण
सदर कामामध्ये 11.00 कि.मी. दुपदरी पक्क्या बाजुपट्ट्यांसह काँक्रिट रस्त्याचे, 4 लहान पूल, 94 मोऱ्या व रस्ता सुरक्षा उपाययोजनांसह 13 तिठ्यांचे काम मंजुर आहे. त्याचबरोबर भुसंपादन, सेवा वाहीन्यांचे स्थानांतरण व रस्त्याकडील झाडे लावणे या बाबीही समाविष्ट आहेत.
सदर कामासाठी कंत्राटदाराची नियूक्ती करण्याच्या दृष्टीने दि. 01.12.2022 निविदा सुचना काढण्यात आलेली असुन कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन मे. भवानी कन्स्ट्रक्शन कं. कोल्हापूर यांची कंत्राटदार म्हणुन निश्चिती झालेली आहे. त्यामुळे सदर लांबीची पावसाळ्यापुर्वी खड्डे भरुन पृष्ठभाग दुरुस्तीची कामे करुन यापुढील देखभाल दुरुस्तीसाठी मे. भवानी कंन्स्ट्रक्श्न कं., कोल्हापूर यांचेकडे हस्तांतरण करण्यात आलेले आहे.
18 महिन्यात काम पूर्ण होणार
दि. 20.08.2023 पर्यंत कंत्राटदारासमवेत करारनामा होऊन 20 सप्टेंबर 2023 पर्यंत कामाच्या जागेची कंत्राटदारासमवेत संयुक्त पाहणी करुन प्रत्यक्षकाम सुरु करण्याचे आदेश देण्याचे उद्दीष्ट आहे. कामाची मुदत 18 महिने असुन दि. 31.03.2025 पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षीत आहे,अशी माहिती आज विधान भवनात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.