कणकवली (प्रतिनिधी) : तालुका पत्रकार समितीच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारा पत्रकार, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार तसेच निबंध स्पर्धेतील विजेत्यांचे बक्षीस वितरण समारंभ शनिवार २१ जानेवारी रोजी सकाळी ११ वा. कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात होणार आहे.
यावेळी आमदार नीतेश राणे, शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी आमदार परशुराम उपरकर, नगर पंचायतीचे गटनेता तथा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, राष्ट्रवादीचे नेते तथा नगरसेवक अबिद नाईक, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर, सचिव देवयानी बरसकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
पत्रकार संघाच्यावतीने यावर्षी उद्योजक पुरस्कार संजय आग्रे, सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार दिविजा वृद्धाश्रमाच्या दीपिका रांबाडे, बाळाशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार संतोष वायंगणकर, शशी तायशेटे स्मृती आदर्श पत्रकार पुरस्कार महेश सावंत, अनिल सावंत स्मृती ग्रामीण पत्रकार पुरस्कार विनय सावंत, तर उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार रमेश जामसंडेकर यांना देण्यात येणार आहे.
यावेळी पत्रकार समितीच्यावतीने आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर देसाई, सचिव संजय राणे, खजिनदार नितीन कदम तसेच सर्व कार्यकारिणी व सभासदांच्यावतीने करण्यात आले आहे.