सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : हिंब्ज हॉलिडेज प्रा ली. च्या माध्यमातून विविध गुंतवणूकदारांची एकूण 1 कोटी 66 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी संजय गोविंद गुरव ( रा.शिवडी ,मुंबई ) याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश डॉ. सानिका जोशी यांनी नामंजूर केला. याकामी सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला. आरोपी संजय गुरव हा गुन्हा दाखल झाल्यापासून 5 वर्षे फरार होता. आरोपी गुरव याच्याविरोधात देवगड कुडाळ सावंतवाडीत गुन्हा दाखल असून या तीन्ही दाखल गुन्ह्यातील जामीन अर्जाला हरकत घेताना सरकारी वकील देसाई यांनी पूढील मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
आरोपी हा परजिल्ह्यातील असून न्यायालयीन तारखांना गैरहजर राहण्याची शक्यता आहे, आरोपी गुरव हा हिंब्ज हॉलिडेज प्रा ली कंपनीचा संचालक असून आर्थिक गुन्ह्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग आहे, या गुन्ह्यातील रक्कम आरोपीने अन्य आरोपींच्या साहाय्याने कोठे गुंतवणूक केली असून जामिनावर मुक्त झाल्यास तो त्याची परस्पर विल्हेवाट लावू शकतो, या गुन्ह्यातील अन्य दोन आरोपी अद्याप फरार असून आरोपी गुरव चा जामीन नामंजूर झाल्यास सदर दोन्ही आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे, साक्षीदारांवर हस्ते परहस्ते दबाव आणून त्यांना साक्ष देण्यापासून परावृत्त करू शकतो. सरकारी वकील रुपेश देसाई यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा न्यायाधीश डॉ. सानिका जोशी यांनी आरोपी संजय गुरव चा जामीन अर्ज फेटाळला.












