मालवण (प्रतिनिधी) : कालावल खाडीपात्रात अनधिकृतरित्या वाळु उत्खनन सुरू आहे. यावर स्थानिक महसूल यंत्रणेकडून कारवाई होत नसल्याने संतप्त बनलेल्या खोत जुवा बेट येथील महिला व ग्रामस्थांनी तहसील कार्यालय येथे धडक देत तहसीलदार वर्षा झालटे यांच्यासमोर वस्तुस्थिती मांडली.
दरम्यान, वर्षा झालटे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे व पथक घटनास्थळी पोचले. काही नौका खाडी पात्रात वाळू उत्खनन करत असल्याचे दिसून आले. त्यांचा पाठलाग करत चार नौकांवर कारवाई करण्यात आली तर काही नौका पळून गेल्या. यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचे तहसीलदार झालटे यांनी स्पष्ट केले.
कारवाई होऊनही वाळू उत्खनन सुरू राहिल्यास १५ ऑगस्ट रोजी उपोषण छेडले जाईल असा इशारा ग्रामस्थांनी यावेळी प्रशासनास दिला आहे. यावेळी खोत जुवा बेट येथील रहिवाशी महिला ग्रामस्थांनी अनधिकृत वाळू उत्खनन प्रश्नी समस्या, तक्रारींचा पाढा वाचला. वाळू उत्खनन कामगारांच्या वर्तणूकी बाबतही महिलांनी तक्रारी केल्या. सर्व तक्रारी ऐकून घेत कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन तहसीलदारांनी ग्रामस्थांना दिले.
अनधिकृत वाळू उत्खनन होत असलेल्या परिसरात महसूल यंत्रणेच्या माध्यमातून सतत गस्त व पाहणी केली जाईल. अनधिकृत वाळू उत्खनन करणाऱ्या होड्यांवर तसेच किनाऱ्यावर नोंदणी नसलेल्या स्वरूपात असलेल्या कारवाई केली जाईल. तसेच बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या वाळू उत्खनन कामगार तसेच त्यांनी बेकायदेशीर उभारलेल्या झोपड्या यावरही कारवाई करून त्यांना त्यांच्या प्रांतात पाठवण्या बाबत महसूल पोलिस यंत्रणेला तहसीलदार वर्षा झालटे यांनी सूचना दिल्या आहेत.
तहसीलदार वर्षा झालटे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी ग्रामस्थांसोबत छोट्या नौकेतून कालावल खाडी पात्रात पाहणी केली. कुठे कुठे अनधिकृत स्वरूपात वाळू उत्खनन होते. होड्यातील वाळू कुठे उतरवली जाते. याबाबत प्रत्यक्ष पाहणी करत माहिती घेतली.













