कोकण शिक्षक मतदारसंघातील उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा दणदणीत विजय
वैभववाडीत शिक्षक वर्गाकडून विजयाचा आनंदोत्सव साजरा
वैभववाडी (प्रतिनिधी) :
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षण मतदारसंघ निवडणुकीतील पहिला निकाल नुकताच जाहीर झाला. कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपा बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले आहेत. म्हात्रे यांनी महाविकास आघाडीचे बाळाराम पाटील यांचा पराभव केला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघात शेकापचे बाळाराम पाटील आणि भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात सरळ लढत झाली होती. या निवडणुकीत ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मताधिक्य घेत आपला विजय नोंदवला आहे. या पार्श्वभूमीवर वैभववाडी येथे अर्जुन रावराणे विद्यालय, कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल येथे ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. शिक्षकांचा आमदार शिक्षकच..! झाल्याने विद्यालयातील शिक्षक वृंद यांनी फटाके वाजवून विजयाचा गुलाल उधळीत जल्लोष साजरा केला.
यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे अधिक्षक तथा स्थानिक अध्यक्ष जयेंद्र रावराणे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, तालुकाध्यक्ष नासिरभाई काझी, सुधीर नकाशे आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते व विद्यालयाचे शिक्षक उपस्थित होते.