ब्युरो न्युज (मुंबई) : मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला लोकल ट्रेनमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा फोन आला आहे. रविवारी सकाळी मुंबईतील पोलीस नियंत्रण कक्षाला हा फोन आला होता. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून आणणार असल्याचं फोन करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना सांगितलं. विशेष म्हणजे कालच (5 ऑगस्ट 2023) मुंबई पोलिसांना विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली होती. आज मुंबई लोकलसंदर्भातील धमकी आल्यानंतर रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
गेल्या 2 दिवसांपासून धमकीचे फोन येताना पहायला मिळत आहेत. काल मुंबई विमानतळ उडवून देण्यासंदर्भात आलेल्या धमकी प्रकरणात सहारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार होता. आज रेल्वेमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा फोन आला. मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला आलेला हा फोन महिला पोलीस अधिकाऱ्याने रिसिव्ह केला. या महिला पोलीस अधिकाऱ्याने फोन करणाऱ्या व्यक्तीकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र फोन करणाऱ्या व्यक्तीने हा फोन कट केला, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे. आता हा फोन नेमका कुठून आला होता यासंदर्भातील ट्रेसिंग करण्याचं काम पोलिसांनी सुरु केलं आहे. अशाप्रकारे फोन करुन अनेकदा धमक्या दिल्या जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे अशाप्रकारे फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर कारवाई करतात. अशा फोनमुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण होतं.













