कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : मंत्री हसन मुश्रीफ यांनी सत्ताधारी पक्षाला खुश करून आपली सुटका करून घेतली. जे तुरुंगात गेले नाहीत, ते भाष्य करताहेत. त्यांच्यावर कारवाई सुरू झाली होती, मात्र आता कारवाई थांबली. त्यांनी जे केलंय ते आम्हा कोणालाही मान्य नसल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुश्रीफ यांच्यावर केलीय. आज ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
राष्ट्रवादी पक्षाच्या स्वाभिमानी सभेसाठी शरद पवार शुक्रवारी संध्याकाळी कोल्हापुरात आलेत. आज त्यांची कोल्हापुरात पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. इंडिया आघाडीची उद्याच्या 31 तारखेला मुंबईत बैठक आहे. देशपातळीवर विरोधी पक्षांची ही बैठक आहे. या बैठकीत एकत्रित प्रचार मोहीम आणि लोकसभा निवडणुकीत एकत्रित राहण्याचा आढावा घेण्यात येणार आहे. महाविकास आघाडी आणि डावे पक्ष यांना एकत्र घेऊन योग्य ती आघाडी करणार आहे, ज्यांची निवडून येण्याची क्षमता आहे, त्यांनी आग्रह धरावा हे आम्ही सुचवणार आहोत. पक्ष फोडण्याचं काम भाजप करतंय. तुमचा विचार सोडा आणि आमच्यात या असं सत्ताधारी पक्षाचं धोरण आहे, असं यावेळी पवार यांनी सांगितलं. अजित पवार यांच्यावर पुन्हा कोणताही प्रश्न विचारू नका. सध्या बारामतीमध्ये आम्ही सभा घेणार नाही, मात्र पुणे जिल्ह्यात सभा घेणार आहोत. आम्ही निवडणुकीत भाजप विरुद्ध मते मागितली. त्यामुळे ते 56 जण भाजप सोबत जाणार होते हे मला मान्य नाही. मतदारांना फसवणे मला मान्य नाही, असंही ते म्हणाले.
यावेळी शरद पवार म्हणाले कि, महाराष्ट्रात भाजप आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांवर सामान्य लोकांची नाराजी आहे असं चित्र दिसतंय. राज्यात निवडणुका घेतल्या पाहिजेत, मात्र भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेत नाही, कारण त्यांचा या निवडणुकीत पराभव होईल असं वाटतंय.प्रधानमंत्री हे देशाचे असतात. मात्र त्यांचे निर्णय फक्त गुजरातच्याचं हिताचे असतात. मणिपूर आणि शेजारील राज्यात शांतता राहिलेली नाही. प्रधानमंत्री मणिपूरला गेले नाही, त्यांना तिथं जाणे महत्वाचं वाटलं नाही, अशी पवार यांनी मोदी यांच्यावर टीका केली.