ग्रामस्थांनी वाळुने भरलेली होडी पकडून दिली महसूल अधिकाऱ्यांच्या ताब्यात
उत्खनन करणाऱ्या भैय्या कामगारांचे पलायन
चौके (अमोल गोसावी) : काळसे बागवाडीनजीक कर्ली खाडीतील वाळू उत्खननासाठी उच्च न्यायालयाने प्रतिबंधीत केलेल्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाळू उत्खनन सुरु असून यावर वारंवार आवाज उठवूनही महसूल प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने स्थानिक ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत झाल्याने आज रविवार दिनांक २७ ऑगस्ट रोजी सदर क्षेत्रात दुपारी ३ वाजता सात ते आठ होड्या विनापरवाना वाळू उत्खनन करत असताना ग्रामस्थांनी दुसऱ्या होडीने जात त्यापैकी एक होडी आणि वाळू उत्खनन करणारे भैया कामगार यांना पकडले या दरम्यान होडीतील १२ भैय्या कामगारांनी मात्र नदित उड्या मारून पलायन केले. परंतु ग्रामस्थ सुमारे आठ ब्रास वाळूने भरलेली होडी पकडण्यात मात्र यशस्वी झाले.
दरम्यान अनधिकृतरित्या उत्खनन करणारी होडी पकडण्यासाठी बागवाडीतील श्री. रावजी माड्ये , रामकृष्ण खोत , आनंद खोत , सुधीर खोत , संजय खोत , रमेश खोत , श्रेयस खोत , किरण माड्ये , सुशांत खोत , सर्वेश खोत , वासुदेव खोत , यांनी नदीमध्ये उतरून भैय्या आणि होडी पकडली. अशी माहिती सुधीर उर्फ बाळू खोत यांनी यावेळी दिली यानंतर ग्रामस्थांनी तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क करून घटनास्थळी बोलावून घेतले आणि सदर होडी महसूल अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिली. यावेळी आंबेरी मंडळ अधिकारी दिपक शिंग्रे, धामापूर तलाठी एस. के. थोरात , वायरी तलाठी वसंत राठोड , देवली तलाठी आर. आर. तारी, पोलिस पाटील विनायक प्रभु, कोतवाल प्रसाद चव्हाण. आदि महसूल अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान यावेळी स्थानिक ग्रामस्थ श्री. आनंद खोत यांनी सांगितले कि , कर्लीखाडी किनारी आमची घरे असून गेली अनेक वर्षे या क्षेत्रात अनधिकृत वाळू उत्खनन होत असून आमच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. यासाठी आम्ही न्यायालयात पिटीशन दाखल केली असून उच्च न्यायालयाने नेरुरपार पुल ते काळसे हद्दी पर्यंतच्या क्षेत्रात वाळू उत्खननास बंदी घातली आहे. तरीही न्यायालयाने प्रतिबंधीत केलेल्या या क्षेत्रात दररोज दहा ते पंधरा होड्या अनधिकृत रित्या वाळू उत्खनन करत असतात. आणि उपसा केलेली वाळू वालावल , धामापूर याठिकाणी नेउन गाड्यांमध्ये भरली जाते. त्यापैकी एक होडी आज आम्ही पकडून महसूल अधिकाऱ्यांच्या ताब्यात देत आहोत. न्यायलयाचा आदेश धुडकावून प्रतिबंधीत क्षेत्रात वाळू उत्खनन करणाऱ्या सर्व होड्यांवर आणि भैय्या कामगारांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी. सदर होडीतील पळून गेलेल्या भैयांची चौकशी व्हावी तसेच सध्या बागवाडीमध्ये अनधिकृतरित्या राहत असलेल्या ४० ते ५० भैय्या कामगारांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी. तसेच सदर अनधिकृतरीत्या उत्खनन केलेली वाळू कोणाच्या जमिनीत काढली जाते आणि कोणत्या वाहनांमधून वाहतूक केली जाते याचीही चौकशी करावी आणि वाळू माफियांमुळे आम्ही विरोध करणाऱ्या ग्रामस्थांच्या जिवितास धोका आहे. याचीही दखल पोलिस प्रशासनाने घ्यावी त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी अशी मागणीही यावेळी आनंद खोत आणि उपस्थित ग्रामस्थांनी केली.
ग्रामस्थांच्या कारवाईच्या मागणीवर बोलताना आंबेरी मंडळ अधिकारी दिपक शिंग्रे यांनी अशी प्रतिक्रिया दिली
कि, काळसे बागवाडीमध्ये होणाऱ्या अनधिकृत वाळू उत्खननाबाबत स्थानिक ग्रामस्थांकडून तक्रारी आमच्याकडे दाखल होत होत्या. आज ग्रामस्थांनी वाळुने भरलेली पकडलेली होडी आम्ही ताब्यात घेऊन पंचनामा करून ती पोलीस पाटील आणि ग्रामस्थांच्या ताब्यात देत आहोत. तसेच पळून गेलेल्या भैयांवर कारवाई केली जाईल आणि आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुढील कारवाई केली जाईल. आणि उच्च न्यायलयाने प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रात अनधिकृत वाळू उत्खनन रोखण्यासाठी यापुढे कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन स्थानिक ग्रामस्थांना शिंग्रे यांनी यावेळी दिले.
वाळूने भरलेल्या त्या होडीला दिली जलसमाधी
दरम्यान अनधिकृतरित्या पकडलेली वाळूने भरलेली होडी मालवण महसूल पथकाने कडक कारवाई करत नदिच्या मध्यावर नेवून बुडवत होडीला जलसमाधी दिली. या कारवाईमुळे परीसरात अनधिकृत वाळू उत्खनन करणाऱ्या वाळू माफियांचे मात्र धाबे दणादणले आहेत. उपविभागीय अधिकारी कुडाळ ऐश्वर्या काळुसे व मालवण तहसिलदार वर्षा झाल्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.












