रंजल्या गांजलेल्यांवर मायेची पाखर पांघरणारा पणदूरचा विठुराया म्हणजेच संदिप परब

संदिप परब यांची कविता ही वेदनेची, संवेदनेची आणि माणूस म्हणून जगण्याची कविता आहे – प्रसाद कुलकर्णी,जेष्ठ कवि व साहित्यिक

फुटपाथ एक विद्यापीठ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

खारेपाटण (प्रतिनिधी) : “पंढरपूरचा विठुराया गेली अठ्ठावीस युगे कमरेवर हात घेऊन लोकांची दुःखे ऐकत निश्चलपणे उभा आहे. आणि आमच्या पणदूरचा हा विठुराया तेच हात सरसावून लोकांना मदत करण्यासाठी धावतो. रंजले, गांजले, दिन दुबळे यांच्यावरती आपल्या मायेची पाखर पांघरतो. म्हणून तो मला पंढरपूरच्या विठुरायापेक्षा श्रेष्ठ वाटतो. “असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य आणि ज्येष्ठ कवी प्रसाद कुलकर्णी यांनी श्री संदीप परब यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना काढले.

दादरच्या वनमाळी सभागृहात जीवन आनंद संस्था व संविता आश्रमाचे संस्थापक समाजसेवक श्री संदीप परब यांच्या फूटपाथ -एक विद्यापीठ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर मुंबईचे अँडिशनल कलेक्टर उपेंद्र तामोरे, शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या मातोश्री ज्योती राणे, निवृत्त प्राचार्य डाँ.डि.एम मुळे, मुक्तांगणचे प्रशासकीय अधिकारी चैतन्य वेंगुर्लेकर फेसकाँमचे शरद डिचोलकर व विजय औंदे, प्रा.डाँ.राहुल अहेर हे मान्यवर उपस्थित होते. संविता आश्रमाचा दहावा वर्धापन दिन, आश्रमाचे संस्थापक, समाजसेवक श्री संदीप परब यांचा ५० वाढदिवस आणि त्यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन असा त्रिधारा योग यावेळी जुळून आला होता. कार्यक्रमाला रसिकांनी आणि जीवन आनंद संस्थेच्या हितचिंतकांनी उदंड गर्दी केली होती.

यावेळी अँडिशनल कलेक्टर उपेंद्र तामोरे यांनी संस्थेच्या शिस्तबध्द कार्याबद्दल व कार्यकर्त्यांच्या बांधीलकीबद्दल गौरवोद्गार काढले व संस्थेतील पाच बालकांच्या शिक्षणासाठी सर्वोत्तोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले.तर सेवा निवृत्त प्राचार्य डाँ.डि.एम.मुळ्ये यांनी ” संदिप सरांनी केलेले अफलातून कार्य पाहून हृदय हेलावून जात असल्याचे म्हटले.व या कार्याची सैधांतिक व अँकँडेमिक अंगाने मांडणी होण्याची आवश्यकता असल्याचे सांगून शासन पातळीवर धोरणात्मक बदलासाठी आवश्यक डेटाबेस तयार होण्याची अत्यंतिक आवश्यकता असल्याचे,” त्यांनी म्हटले. तसेच शहीद जवान मेजर कौस्तुभ राणे यांच्या मातोश्री ज्योती राणे यांनी बोलताना संदिपदादा परब यांच्या आई वडिलांनी मातृहृदयी

मुलगा जन्माला घातल्याचे सांगून आपण परमेश्वराला देवळात शोधतो.पण देव हा नेहमी दीन दलितांत वसलेला असतो असे म्हटले.चैतन्य वेंगुर्लेकर, विजय औंदे, डाँ.राहुल अहेर यांनी विचार मांडले. जीवन आनंद संस्थेचे खजिनदार रामचंद्र अडसुळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संदिप परब यांनी संस्थेच्या कामकाजातील फोटो प्रेझेंटेशन आधारे संस्थेच्या विविधांगी कार्याची मांडणी केली. संस्थेचे अध्यक्ष नरेश चव्हाण यांनी संदिप च्या कार्याबद्दल अभिमान असल्याचे सांगून मान्यवर आणि पाहुण्यांचे आभार मानले.तर फुटपाथ एक विद्यापीठ या काव्य संग्रह निर्मितीबद्दल संदिप परब यांचे गुरूवर्य व सायली क्रियेशन्सचे श्रीनिवास सावंत यांनी विचार मांडले.

काव्यसंग्रह प्रकाशन व वर्धापन दिन कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे विश्वस्त जितेंद्र परब, किसन चौरे, मुंबई विभाग कार्यकर्ते संपदा सुर्वे, कविता अडासुळे, कल्पना चौघुले, सुनिता भंडारी,रूपेश गावडे काका , अपेक्षा पाटिल, रत्ना लांघी, राहुल देशमुख,राजा यादव ,संविता आश्रमचे देवु सावंत, सचिन पडते, आरती वायंगणकर, लिना पालकर, सायली क्रियेशन्सच्या सायली सावंत , पंकज भिवाजी, सुशिल नरसियन यांचेसह इलाईट टेक्नोसिसचे सुरज मोरे व त्यांचा संघ, समर्थ आश्रमचे भाईदास माळी, दिपक अडसुळे ,वैशाली काकड,चंदा छेत्री, संस्थेच्या धुळे येथील आधार प्रकल्पचे गणेश उफाडे यांचेसह जिवन आनंद संस्थेच्या कार्यकर्त्यांचा सक्रीय व प्रमुख सहभाग होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!