फोंडाघाट मधील देवघर धरण कालव्यातील दुर्घटनेला पाटबंधारे विभाग जबाबदार
कणकवली तालुका चर्मकार समाज अध्यक्ष महानंदा चव्हाण यांचा आक्षेप
कणकवली (प्रतिनिधी) : ३१ ऑगस्ट रोजी देवघर धरणाच्या कालव्यातील चिखलात रुतलेल्या दहावीतील विद्यार्थी उदय रमेश शिरवलकर याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मानवी वस्ती लगत असलेल्या या कालव्याला आच्छादन करणे ही जलसंपदा विभागाची जबाबदारी आहे. मात्र याकडे जलसंपदा विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे आजवर अनेक पशु तसेच अन्य जीवितहानी आजवर झालेली आहे.शिरवलकर कुटुंबीयांचा एकुलता एक मुलगा उदय याच्या मृत्यूस जलसंपदा विभाग जबाबदार असून अजून किती बळी घेतल्यावर शासनाला जाग येणार आहे असा संतप्त सवाल कणकवली तालुका चर्मकार समाज अध्यक्ष महानंदा चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकातून विचारला आहे.मृत उदय शिरवलकर याच्या कुटुंबियांना कुटुंबियांना शासनाने आपत्कालीन दुर्घटना म्हणून आर्थिक मदत द्यावी असे आवाहनही महानंदा चव्हाण यांनी केले आहे.जनतेच्या हितासाठी , शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शासनाने या जिल्ह्यात मोठी व लहान अशी धरणे , पाझर तलाव बांधली . फोंडा कुर्ली येथील देवधर धरण या धरणाची निर्मिती झाल्यापासून आज मितीस कित्येक गोर – गरीबांचे बळी या धरणांने घेतले. कारण धरण झाले पण त्यानंतरच्या पायाभूत सुविधा आज पर्यंत जेवढ्या व्हायला हव्या होत्या त्या पूर्ण झाल्या नाहीत.
संबंधीत विभागाने कालव्याच्या रूपाने पाणी पुरवठा सुरु केला पण हे मोठे कालवे सुमारे दहा पंधरा फुट खोल असून त्यांना आपत्ती सुरक्षा व्यवस्थापन नाही . मनुष्यवस्ती जवळून हे कालवे वाहतात तिथे कालवे बंदिस्त असणे गरजेचे आहे. मानववस्ती जवळ कालव्याना अजूनही बंदिस्तपणा नाही. कित्येक शेतकऱ्यांची जनावरे पडून या कालव्यात मृत झाली पण नुकसान भरपाई नाहीच . 31 ऑगस्ट रोजी घडलेल्या दुर्घटनेत साईनगर फोंडाघाट येथील चर्मकार समाजातील रमेश शिरवलकर यांचा 16 वर्षीय एकुलता एक मुलगा उदय याचा मृत्यू झाला. शिरवलकर कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. रमेश शिरवलकर हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात . शासनाने दिवंगत उदय च्या कुटीबीयांना आर्थिक मदत करणे गरजेचे आहे. अशा दुर्घटना पुन्हा घडणार नाहीत यासाठी कायम स्वरूपी उपाययोजना करण्यासाठी संबंधीत यंत्रणेने पावले उचलावीत असे आवाहनही चव्हाण यांनी केले आहे.