चिंदर परिसरात भातशेतीवर परिणाम
आचरा (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील चिंदर पंचक्रोशीत(त्रिंबक, पळसंब, बांदिवडे, आचरा, वायंगणी) गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून ऐन शेतीच्या हंगामात पावसाने दडी मारली असून भरडी तसेच मळा भात शेतीवर याचा परिणाम आता दिसू लागला आहे. शेतीत सुकून जमिनीला भेगा पडल्या असून, भूईमूग, नाचणी इत्यादी पिके पाऊस नसल्याने सुकू लागली आहे. अनेक संकटाचा सामना करत बळीराजा मेहनतीने शेती करत असतो. चिंदर पंचक्रोशीत बहूसंख्य कष्टकरी शेतकरी वर्ग असून शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने सध्या बळीराजा चिंताग्रस्त झाला असून लवकर पावसाचे पुनर्रागमन व्हावे यासाठी प्रार्थना करताना दिसत आहे.