लकी ड्रॉ काढत २५० भजन मंडळाना याचा लाभ मंजूर
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या भजनी मंडळाना साहित्य पुरविणे योजनेला मोठा प्रतिसाद लाभला आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या बजेट मधून जिल्ह्यातील भजनी मंडळांना साहित्य देण्यासाठी राबविलेल्या या योजनेच्या लाभासाठी ३ हजार २२२ अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे आज प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या उपस्थितीत लकी ड्रॉ काढत यातील २५० भजन मंडळाना याचा लाभ मंजूर करण्यात आला. ग्राम पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद प्रशासक नायर यांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील भजनी मंडळांना वाद्य साहित्य पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पहिल्याच वर्षी २५ लाख रुपये एवढी भरीव आर्थिक तरतूद केली आहे. ही योजना एवढी लोकप्रिय झाली की जिल्ह्यातील तब्बल ३ हजार २२२ भजनी मंडळांनी यासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर केले. त्यामुळे जिल्हा परिषदेला लाभार्थी निवड करण्यासाठी लकी ड्रॉ पद्धत अवलंबावी लागली. गुरुवारी प्रत्येक्षात यासाठी सोडत कार्यक्रम राबविण्यात आला.
