सहकार रत्न हरपले ! कॅथॉलिक अर्बन बँकचे संस्थापक अध्यक्ष पी.एफ.डांटस यांचे निधन

सावंतवाडी (प्रतिनिधी) : कॅथॉलिक अर्बन पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी सैनिक पी. एफ. डॉन्टस यांचे निधन झाले. शनिवारी रात्री वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेले काही दिवस ते आजारी होते. पी. एफ. डॉन्टस यांच्या निधनानं सहकार क्षेत्रात भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. पी.एफ. डॉन्टस हे सैन्य दलामध्ये सेवेत होते. सैन्य दलातून निवृत्त झाल्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकार खात्यामध्ये त्यांनी नोकरी केली. यावेळी प्रथम त्यांनी राज्य सरकारी कर्मचारी संघटना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्थापन केली. र. ग. कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली ते कार्य करत होते. त्यांच्या जाण्याने सहकार क्षेत्र, तसेच माजी सैनिक संघटना यांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेची त्यांनी स्थापना केली होती. दरम्यानच्या काळात त्यांनी काँग्रेस पक्षाचे काम करण्यास सुरुवात केले. ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचे ते विश्वासू सहकारी होते किंबहुना ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या खासदारकीत त्यांचा मोलाचा वाटा होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माजी सैनिक संघटनेचे ते अध्यक्ष होते. माजी सैनिकांसाठी सैनिक पतसंस्थेची स्थापना त्यांनी केली. तर आपल्या कॅथलिक बांधवांसाठी कॅथलिक पतसंस्थेची स्थापना त्यांनी केली. या दोन्ही संस्था आज जिल्ह्यातील अग्रणी संस्था म्हणून गणल्या जातात. त्याचे सर्व श्रेय पी.एफ. डॉन्टस यांना जाते. सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीची स्थापना त्यांनी केली. पंधरा वर्षांपूर्वी साप्ताहिक सरहद्द त्यांनी सुरू केले असून त्याचे संपादक स्वतः होते. याचबरोबर अनेक सहकारी संस्था त्यांनी स्थापन केल्या असून त्या माध्यमातून त्यांनी शेकडो लोकांना नोकऱ्या दिल्या व व्यवसाय करण्यास मदत केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, सून, नातवंडे, बहीणी, पुतणे, पुतण्या असा मोठा परिवार आहे. उद्या सोमवारी साडेआठ वाजता त्यांच्या घराकडून त्यांची अंतयात्रा निघणार असून या अंतयात्रेमध्ये ख्रिश्चन बांधव, माजी सैनिक, सहकार खात्यातील त्यांची मित्र मंडळी सामील होणार आहेत. यावेळी सैनिक स्कूल आंबोलीचे विद्यार्थी त्यांना मानवंदना देणार आहेत. त्यानंतर दहा वाजता न्यू खासकीलवाडा येथील सेमिस्ट्रीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने सहकार क्षेत्रातील आधारवड गेल्याची हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!