सावंतवाडी (प्रतिनिधी): राज्यभरात साजऱ्या होत असलेल्या वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने सावंतवाडी वन विभागाकडून नरेंद्र वनउद्यान येथे विद्यार्थी व निसर्गप्रेमी यांचेसाठी निसर्गभ्रमंती व प्रबोधनपर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामध्ये बॅ.बाळासाहेब खर्डेकर कॉलेज, वेंगुर्ला चे विद्यार्थी व माय वे जर्णी ऑर्गनायजेशनची टीम मार्गदर्शक म्हणून लाभली. याचा सविस्तर वृत्तांत असा की, राज्यभरात दिनांक 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान, समाजामध्ये वन्यजीवांबाबत जनजागृती दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या वन्यजीव सप्ताहानिमित्त सावंतवाडी वन विभागाकडून नरेंद्र डोंगरावर आढळणाऱ्या जैवविविधतेचे निरीक्षण करून त्याबाबत विद्यार्थी व निसर्गप्रेमी यांना माहिती देण्याच्या उद्देशाने निसर्गभ्रमंतीचे आयोजन करण्यात आले. या निसर्गभ्रमंती दरम्यान नरेंद्र डोंगरावर शेकरू, वटवाघूळ, हॉर्नबिल तसेच कोळी, पक्षी, कीटक, मुंग्या यांच्या समृद्ध जैवविविधतेचे दर्शन झाले. या सकाळच्या सत्रातील नैसर्गभ्रमंती नंतर सर्व विद्यार्थी व निसर्गप्रेमी यांचेसाठी दुपारच्या सत्रात वन्यजीव व निसर्गसंवर्धन यांच्याविषयीच्या प्रबोधनपर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान डॉ. योगेश कोळी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जैवविविधतेबाबत मार्गदर्शन केले. यानंतर दुसऱ्या व्याख्यानात सावंतवाडीतील सर्पमित्र व वन्यजीवप्रेमी नाविद हेरेकर यांनी विविध प्रजातींचे साप व सर्पदंशावरील प्रथमोपचार याचेवर मार्गदर्शन केले. तसेच हेरेकर यांचा लहान मुलगा कबीर याने सर्वांना प्लास्टिक बॉटल ब्रिक तयार करणे व प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट यांचेविषयी संकल्पना सांगितली. या निसर्गभ्रमंती व प्रोबोधनपर व्याख्यानमाला कार्यक्रमाचे आयोजन उपवनसंरक्षक सावंतवाडी नवकिशोर रेड्डी यांचे संकल्पना व मार्गदर्शनातुन, सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर व सर्व सावंतवाडी परिक्षेत्र वनपाल, वनरक्षक व वनमजुर यांच्या सहभागाने करण्यात आले.