कणकवली (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या कामगार आघाडी सेलच्या जिल्हा संयोजकपदी कामगार नेते अशोक राणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कामगार क्षेत्रात अशोक राणे यांचे असलेले भरीव योगदान लक्षात घेऊन तसेच अनेक वर्षे एस.टी. कामगारांचे सोडवणूक केलेले अनेक प्रश्न आणि प्रवासी जनता, नागरीकांचे, विद्यार्थी वर्गाचे एस.टी.विषयक निराकरण केलेल्या समस्या यांची दखल घेऊन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत, यांनी ही नियुक्ती केलेली आहे. मागील कणकवली महोत्सवात नगरपंचायतीच्या वतीने मा. केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालक मंत्री रविंद्र चव्हाण, यांचे हस्ते कामगारांसाठी केलेल्या कार्याबाबत त्यांचा सत्कार करण्यात आलेला होता. विविध क्षेत्रातील संघटीत व असंघटीत कामगार, एस. टी. कर्मचारी तसेच प्रवासी वर्ग नागरीक, विद्यार्थी, सेवानिवृत्त कर्मचारी इ. साठी काम करून त्यांच्या प्रश्नाला न्याय देण्याचे काम करणार असल्याचे अशोक राणे यांनी म्हटले आहे.