कणकवली तेली आळी हर्णे आळी जोडरस्ता वळण रुंदीकरणा च्या भूसंपदनाला सुरुवात
वाहतूक कोंडीपासून होणार सुटका
कणकवली (प्रतिनिधी): कणकवली शहरातील तेली आळी ते हर्णे आळी पर्यंतच्या अरूंद वळण असलेल्या रस्त्याचा मार्ग आता मोकळा करण्यात आला आहे. गेले अनेक वर्ष या ठिकाणी अरुंद रस्त्यामुळे अनेकदा अपघात होत होते. अरूंद रस्ता असल्यामुळे येथे वाहतूक कोंडीची देखील समस्या निर्माण झाली होती. कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी या प्रक्रिये करिता सातत्याने पाठपुरावा केला होता. तसेच येथील नागरिकांना या रस्ता रुंदीकरणाचे आश्वासन देखील देण्यात आले होते. व त्यानुसार नगरपंचायत मार्फत भूसंपादन प्रक्रिया राबवून हा रस्ता 9 मीटर रुंदीचा करण्याबाबत निर्णय घेतला होता. अखेर आज या ठिकाणच्या बाधित होत असलेल्या दोन घरांची बांधकामे हटविण्यात आली. येत्या काळात येथील रस्त्याचे काम लवकरच मार्गी लागणार असून, कणकवली शहरवासीयांना नवनवीन रस्ते देत असताना शहरातील महत्त्वाच्या भागातील या रस्ता रुंदीकरणाचे काम मार्गी लागल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.











