सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी कार्यालयातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता यांच्या नुतन कार्यालयाचे लोकार्पण पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, कार्यकारी अभियंता पुजा इंगवले, सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी आदी उपस्थित होते.
२४ फेब्रुवारी २०२४ अन्वये मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, कोकण अंतर्गत जिल्हा सिंधुदुर्ग येथे नवीन मंडळाची स्थापना झालेली आहे. या मंडळाअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग, कणकवली, सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडी आणि पत्तन या ३ विभागाचा समावेश होतो. या मंडळासाठी एकूण २४ पदे मंजूर आहेत.
या सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अखत्यारित तब्बल १ हजार ९०२ किलोमीटर लांबीचे रस्ते तर एकूण इमारतींची संख्या ६७७ इतकी आहे. या नव्या मंडळाच्या स्थापनेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम, सुस्थितीत आणि विकासाभिमुख होणार आहे.
















