माजी सरपंच व माजी ग्रा.पं.सदस्य असलेल्या
चिके दाम्पत्याची भाजपात पुन्हा घर वापसी
खारेपाटण (प्रतिनिधी) : मागील दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय क्षेत्रात मोठे बदल होत असून उबाठा सेनेतील अनेक नेते मंडळी आता भाजपात प्रवेश करताना दिसून येत असून कूडाळ मालवण प्रमाणे आता कणकवली – खारेपाटण मध्ये देखील मोठ्या प्रमाणात उबाठा सेनेतील कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाच्या दाखल होताना दिसत आहेत.
याबाबत अधिक वृत्त असे की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खारेपाटण येथील कार्यकर्ते तसेच खारेपाटण गावचे माजी सरपंच म्हणून काम केलेले वीरेंद्र बाळकृष्ण चिके व त्यांच्या पत्नी माजी ग्रामपंचायत सदस्य सौ.उज्वला विरेंद्र चिके या दोन्ही उभयातानी शिवसेना उबाठा पक्षात त्यांच्या होत असलेल्या घुसमटीला कंटाळून अखेर बुधवार दी.१८ ऑक्टोंबर २०२३ रोजी सायंकाळी भाजप आमदार नितेश राणे यांची कणकवली येथे त्यांच्या ओम गणेश या निवास्थानी भेट घेत भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी त्यांच्या समवेत भाजप पक्षाचे कणकवली तालुका अध्यक्ष संतोष कानडे, वारगाव उपसरपंच नाना कोकाटे,भाजप कार्यकर्ते इरफान मुल्ला, अशोक कोकाटे साळीस्ते आदी उपस्थित होते.यावेळी आमदार नितेश राणे यांनी खारेपाटण येथील चिके दांपत्याचे भाजप पक्षात पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
खारेपाटण येथील माजी सरपंच वीरेंद्र चिके व त्यांची पत्नी माजी ग्रामपंचायत सदस्य सौ उज्वला चिके यांनी दीड वर्षापूर्वी भाजप पक्षातून शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केला होता. परंतु शिवसेना पक्षाला अखेर कंटाळून त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर कायम विश्वास ठेऊन भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.यामुळे प्रवेशकर्ते चिके दाम्पत्याची पुन्हा एकदा भाजपा मध्ये घर वापसी झाल्याचे सद्या सर्वत्र बोलले जात आहे. दरम्यान खारेपाटण येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला भाजप पक्षाने मोठा धक्का दिल्याचे बोलले जात असून पुढील येणाऱ्या काळात अजूनही काही कार्यकर्त्यांचे पक्ष प्रवेश भाजपात होणार असल्याचे भाजप सुत्राकडून सांगण्यात आले.











