आचरा ग्रामपंचायत निवडणुकीत अंदाजित 66 टक्के मतदान
कोण ठरणार किंगमेकर? दिग्गजांमध्ये चुरशीची लढत
उमेदवारांचे भवितव्य मत पेटीत बंद-उद्या निकालाची प्रतिक्षा
आचरा (प्रतिनिधी) : बहुचर्चित आचरा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरासरी 66 टक्के मतदान झाले. सरपंच पदासाठी २ तर सदस्यपदाच्या १३ जागांसाठी 29 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. प्रभाग क्र. 5 वरचीवाडी केंद्रातील मतदान मशिन मतदान सुरु झाल्यानंतर काहीवेळाने बंद झाली. नवीन मशिन जोडून पाऊण तासाच्या विलंबानंतर मतदान ‘चालू झाले. निवडणूक अधिकारी संदिप गावडे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक पार पडली. सहा. पोलिस निरीक्षक अनिल व्हटकर व आचरा पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवल्याने मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. प्रभाग 2 मध्ये मतदारांची गर्दी असल्याने उशिरापर्यंत मतदान चालू होते. सायंकाळी 5.30 नंतर मतदान केंद्रावर अंदाजित 35 मतदार मतदान करणे बाकी होते मतदानाची प्रक्रिया चालू होती.
आचरा.ग्रा. पं. निवडणूक मतदानास सकाळी ७.३० वा. सुरुवात झाली. प्रभाग 5 वगळता इतर प्रभागामध्ये मतदान वेळेत चालू झाले. मात्र प्रभाग 5 वरचीवाडी केंद्रातील मतदान मशीन सकाळी मतदान चालू झाल्यानंतर काहीवेळाने बंद पडली. त्यानंतर निवडणूक अधिकारी केंद्रावर दाखल झाले होते. बंद पडलेल्या मशीनच्या ठिकाणी दुसरी मशीन जोडण्यात आली. तब्बल पाऊण तासानंतर पुन्हा मतदानास या केंद्रावर सुरूवात झाली.
आचरा ग्रा. पं. च्या 4146 एकूण मतदारापैकी २६९७ मतदान झाले. यापैकी १३५२ पुरूष मतदारांनी तर १३४५ स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. प्रभाग क्र. १ हिर्लेवाडी, पिरावाडीतील मध्ये एकूण मतदान 680 झाले. या मतदानापैकी पुरूष 347 तर 333 स्त्रीयांनी मतदानाचा हक्क बजावला. या प्रभागातून 62.84 टक्के मतदान झाले. प्रभाग २ जामडूल गाऊडवाडी, काझीवाडा शेखवाडा, डोंगरेवाडी अंदाजित 643 मतदान झाले होते. सायंकाळी 5.30 नंतर मतदान चालू होते मतदान केंद्रावर अंदाजित 35 मतदार मतदान करणे बाकी होते. प्रभाग ३ पारवाडीमध्ये 263 मतदान झाले. या मतदानापैकी पुरूष 142 तर 121 स्त्रीयांनी मतदानाचा हक्क बजावला. या प्रभागातून 69.57 टक्के मतदान झाले. प्रभाग ४ मेस्त्रीवाडी,देऊळवाडी, बाजार, बौद्धवाडी मध्ये 398 मतदान झाले. या मतदानापैकी पुरुष 211 तर 187 स्त्रीयांनी मतदानाचा हक्क बजावला. या प्रभागातून 66.22 टक्के मतदान झाले. प्रभाग ५ वरची वाडी भंडारवाडी नागोचीवाडी मध्ये 710 मतदान झाले. या मतदानापैकी पुरूष 357 तर 353 स्त्रियांनी मतदानाचा हक्क बजावला. या प्रभागातून 71.71 टक्के मतदान झाले.
मालवण तालुक्यातील एकमेव आचरा ग्रा. पं. निवडणूक असल्याने सर्वच पक्षाचे पदाधिकारी आचऱ्या गावात ठाण मांडून होते. भाजपचे पक्षाचे दत्ता सामंत, नीलिमा सावंत, संतोष कोदे, राजन गावाकर धोंडी चिंदरकर, शिंदे सेनेचे तालूकाध्यक्ष महेश राणे बबन शिंदे, हजर होते. तर ठाकरे सेनेचे आमदार वैभव नाईक, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, विनायक परब, नारायण कुबल, व अन्य पदाधिकारी दाखल झाले होते. आचरा ग्रा. पं. सरपंच पदाचे भाजप पुरस्कृत पॅनलचे उमेदवार जेरोन फर्नांडिस व ठाकरे सेनेचे मंगेश टेमकर यांच्यात चुरशीची लढत होणार असल्याची चर्चा जोरदार चालू होती. प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी आपला उमेदवार कसा निवडून येणार हे बेरजेचे गणित घालून सांगताना दिसत होते. आचरा गावातील मतदार मात्र केंद्रावर येऊन मतदान करून निघून जाण्यातच धन्यता मानत होते. आचरा ग्रा. पं. निवडणुकीत भाजप शिंदेसेना पुरस्कृत पॅनल व ठाकरे सेनेच्या पॅनलच्या वतीने दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आचरा ग्रा. पं. वर झेंडा फडकवणार असल्याचा दावा केला आहे.